ही आहेत भारतातील काही प्रसिद्ध हनुमान मंदिरे

hanuman
बजरंगबली हनुमानाची भक्ती भारतामध्ये बहुतेक सर्वच प्रांतांमध्ये रूढ आहे. हनुमानाची नियमित आराधना करणाऱ्यांवर हनुमानांची कृपादृष्टी नेहमीच असते अशी भाविकांची श्रद्धा आहे. भारतामध्ये असलेली अनेक हनुमान मंदिरे खास प्रसिद्ध आहेत. त्यामध्ये राजस्थान येथील बालाजी हनुमान मंदिराचा समावेश आहे. दाढी-मिश्या असलेल्या या बजरंगबलीला ‘सालासरवाले हनुमानजी’ या नावानेही संबोधले जाते. हे मंदिर राजस्थानच्या चुरू जिल्ह्यामधील सालासर गावामध्ये स्थित आहे. या मंदिरामध्ये एखादी मनोकामना घेऊन आलेला श्रद्धाळू कधीही निराश होऊन परत जात नसल्याचा या मंदिराचा लौकिक आहे.
hanuman1
गुजरात राज्यातील ‘हनुमान दंडी’ मंदिरामध्येही भाविकांची रीघ लागलेली पहावयास मिळते. या मंदिरामध्ये हनुमानाच्या सोबत हनुमान-पुत्र मकरध्वजाची प्रतिमा देखील आहे. पूर्वी मकरध्वजाची मूर्ती आकाराने लहान होती, पण आता हनुमानाच्या मूर्तीच्या आकाराइतकी मकरध्वजाची मूर्ती येथे स्थापित करण्यात आली आहे. अहिरावणाने जेव्हा राम-लक्ष्मणाचे अपहरण केले, तेव्हा तो त्यांना याच ठिकाणी घेऊन आला असल्याची आख्यायिका आहे. त्यानंतर राम आणि लक्ष्मणाला सोडविण्यास जेव्हा हनुमान आले, तेव्हा त्यांना मकरध्वजाशी युद्ध करावे लागले. या युद्धामध्ये मारुतीने मकरध्वजाचा पराभव केला व त्याच्याच शेपटीने त्याला बांधून ठेवले. राम आणि लक्ष्मणाला परत नेण्यापूर्वी मकरध्वज आपलाच पुत्र असल्याचा साक्षात्कार मारुतीला याच ठिकाणी झाला असल्याची ही आख्यायिका आहे.
hanuman2
ज्यांना तथाकथित ‘भूतबाधा’ झालेली असते अशा व्यक्तींना घेऊन भाविक राजस्थान येथील मेहंदीपूर हनुमान मंदिरामध्ये येतात. येथे आल्यानंतर बाधा उतरून व्यक्ती पूर्ण बरी होत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. गोस्वामी तुलसीदास यांच्या कठीण तपश्चर्येनंतर प्रकट झालेली मूर्ती असलेले वाराणसी येथील संकटमोचन हनुमान मंदिर आहे. या मंदिरामध्ये येऊन भाविकांनी मारुतीचे केवळ दर्शन घेतल्याने भाविकांच्या अडचणींचे निवारण होत असल्याचे म्हटले जाते. म्हणूनच या मंदिराला संकटमोचन मंदिर या नावाने ओळखले जाते. अयोध्या येथील प्रसिद्ध पवित्र धाम ‘हनुमानगढी’ नावाने ओळखले जाते. रामजन्मभूमीपासून जवळच असलेल्या एका टेकडीवर हे मंदिर आहे. या मंदिरामध्ये दर्शन केल्याखेरीज अयोध्येची यात्रा समाप्त होत नसल्याची भाविकांची मान्यता आहे.
hanuman3
उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील संगमतटावर असलेल्या हनुमान मंदिरातील हनुमानाची मूर्ती निद्रावस्थेतील आहे. वीस फुट लांबीची ही प्रतिमा असून, दर वर्षी पावसाळ्यामध्ये गंगेचे वाढलेले पाणी या मंदिरामध्ये येत असते. गंगेचे पवित्र मानले जाणारे जल या मंदिरामध्ये येणे हा भाविकांच्या साठी शुभसंकेत मानला जातो. हनुमानाला स्नान घालण्यासाठी स्वतः गंगा या मंदिरामध्ये येत असते अशी भाविकांची श्रद्धा आहे.

Leave a Comment