‘ज्युनियर पार्क रेंजर’ म्हणून कार्यरत आहेत या आजीबाई

ranger
जर मन उद्यमशील असेल, तर मनुष्य देखील सक्रीय राहतो. मग त्यामध्ये त्याला वयाची, शारीरिक क्षमतेची अडचण कधीच भासत नाही. सतत काही ना काही तरी करत राहण्याची इच्छा माणसाला बळ देत राहते. अशीच काहीशी कथा आहे अमेरिकेतील रोझ टोर्फी नामक एका महिलेची. रोझचे वय सध्या १०३ वर्षांचे असून, अमेरिकेतील अॅरिझोना राज्यातील सुप्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या ‘द ग्रँड कॅन्यन नॅशनल पार्क’ येथे रोझ ज्युनिअर पार्क रेंजर म्हणून कार्यरत आहे. नॅशनल पार्क मध्ये येणाऱ्या पर्यटकांना मदत करण्यासाठी, पर्यटकांच्या करवी या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे बेजेबाबदर वर्तन घडून पर्यावरणाला कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये यासाठी या पार्क रेंजर्सची नियुक्ती केली जाते.
ranger2
जानेवारी महिन्यामध्ये रोझ आपल्या नातीसह या पार्कमध्ये फिरायला आलेली असताना तिला येथे ज्युनियर पार्क रेंजर म्हणून सेवा करण्याची संधी चालून आली आणि तिने ती आनंदाने स्वीकारली देखील. या पार्कला ‘नॅशनल पार्क’ चा दर्जा मिळाल्याला शंभर वर्षे उलटून गेली असून, या पार्कच्या, येथील पर्यावरणाच्या संरक्षणाचे महत्व रोझ येथे येणाऱ्या पर्यटकांना पटवून देत असते. जर लोकांना पर्यावरणाच्या संरक्षणाचे महत्व कळले, तर हे नॅशनल पार्क येणाऱ्या अनेक पिढ्यांना पहावयास मिळेल अशी आशा रोझ हिने ‘गुड मॉर्निंग अमेरिका’शी बोलताना व्यक्त केली आहे.
ranger1
रोझला नव्याने काही तरी करण्याची संधी मिळाल्याने ती अतिशय समाधानी असल्याचे तिची नात सांगते. येथे येणाऱ्या पर्यटकांशी पर्यावरणाच्या संरक्षणाबाबत चर्चा करून त्यांना त्यांचे महत्व पटवून देणे गरजेचे असून, हे काम रोझ अतिशय निष्ठेने करीत असल्याचे ही तिची नात म्हणते.

Leave a Comment