केवळ व्हेगन असल्याच्या कारणावरून महिलेला कर्ज देण्यास बँक अधिकाऱ्याचा नकार

bank
इंग्लंडमधील ब्रिस्टोल येथील नॅटवेस्ट बँकेमध्ये कर्ज घेण्यासाठी अर्ज देण्यास गेलेल्या महिलेला, केवळ तिने व्हेगन आहारपद्धतीचा स्वीकार केला असल्याच्या कारणावरून बँक अधिकाऱ्याने कर्ज नामंजूर केल्याची धक्कादायक घटना उघडकीला आहे आहे. याबाबत बीबीसी ब्रिस्टोल रेडियोशी बोलताना महिलेने या प्रकरणाचा तपशील कथन केला आहे. ही महिला आहारशास्त्र विषयामध्ये पदविकेचा अभ्यास करीत असून, या अभ्यासक्रमाची फी भरण्यासाठी चारशे पौंड रक्कम कर्ज मिळण्यासाठी तिने बँकेकडे अर्ज केला असता हा प्रकार घडल्याचे तिने म्हटले आहे.
bank1
या विक्षिप्त बँक अधिकाऱ्याने ही महिला व्हेगन असल्याचे कारण देऊन कर्जासाठीचा तिचा अर्ज फेटाळलाच, त्याशिवाय या आहारपद्धतीचा अवलंब केल्याचे सांगून त्याने या महिलेशी अतिशय अपमानास्पद वर्तनही केले. ‘समस्त व्हेगन मंडळींना फटके मारायला हवेत’ असे म्हणत या अधिकाऱ्याने महिलेचा अर्ज फेकून दिला असल्याचे महिलेने म्हटले आहे. या महिलेनेही प्रसंगावधान राखून अधिकाऱ्याचे हे लाजिरवाणे वर्तन आपल्या फोनवर रेकॉर्ड करून घेऊन हे रेकॉर्डिंग बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविल्याचे समजते.
bank2
बँकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानी ही घटना जाताच, व संबंधित रेकॉर्डिंग पाहताच, संबंधित अधिकाऱ्याला कडक शब्दात समज देण्यात येऊन बँकेच्या वतीने या महिलेची माफी मागत, तिला आवश्यक असलेले कर्ज तातडीने मंजूर करण्यात आल्याचे समजते. कोणी कुठली आहार पद्धती स्वीकारावी हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असून, त्यावर अशा प्रकारे टिप्पणी करण्याचा आणि बँकेचा ग्राहक म्हणून त्या व्यक्तीचे हक्क काढून घेण्याचा अधिकार कोणालाही नसल्याचे बँकेने जाहीर माफीनाम्यात म्हटले आहे.

Leave a Comment