…यामुळे उदयनराजे साजरा करणार नाही वाढदिवस

udyanraje-bhosale
सातारा : जम्मू-काश्मीरमधील पुलवामात झालेल्या सीआरपीएफ जवानांवरील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी यंदा आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

खासदार उदयनराजेंचा येत्या 24 फेब्रुवारीला वाढदिवस आहे. पण त्यांनी यावर्षी पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा करणार नसल्याचे म्हटले आहे. उदयनराजेंनी यासंदर्भात कार्यकर्त्यांना उद्देशून पत्र लिहिले आहे. साताराच नव्हे तर राज्यात कुठेही कार्यकर्त्यांनी शुभेच्छांचे फलक लावून नयेत, तसेच हार-पुष्पगुच्छ इत्यादी भेट देऊ नये, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

उदयनराजेंनी कार्यकर्त्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. त्यांच्या कुटुंबावर किती मोठा आघात झाला, याची कल्पना न केलेली बरी. एका विशिष्ट वळणावर आपला देश येऊन ठेपला आहे. देशासाठी भारतीय जवान वीरमरण स्वीकारत असल्यामुळे संपूर्ण देशाने त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. वाढदिवसाचे आम्हाला औचित्य फार नाही. वाढदिवस येतील आणि जातील, पण आज जवानांच्या दु:खात सहभागी होता यावे, या भावनेतून वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे.

Leave a Comment