प्राचीन इजिप्शियन किंवदंती अशा प्रकारे ठरल्या खऱ्या

egypt
इजिप्शियन ममी आणि त्यांच्याशी निगडित इतिहास फार प्राचीन आणि काहीसा गूढ आहे. इजिप्शियन राजांच्या ममींशी निगडित असलेल्या अनेक शापांच्या आख्यायिकाही या इजिप्शियन संस्कृतीमध्ये प्रसिद्ध आहेत. या ममींशी निगडित शापांच्या आख्यायिका, कोणी या ममीला कोणत्या प्रकारचे नुकसान पोहोचवू नये म्हणून प्रसिद्ध केल्या गेल्याचा विश्वास पुरातत्ववेत्त्यांना होता. तसेच प्राचीन इजिप्शियन संस्कृतीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी ममींचे अध्ययन करणेही त्यांच्या दृष्टीने गरजेचे होते. त्यामुळे उत्खाननांतून हस्तगत झालेल्या प्राचीन ममी उघडून पुरातत्ववेत्त्यांनी त्यांचे अध्ययन सुरु केले खरे, पण त्यानंतर घडलेल्या काही घटनांमुळे या ममींशी निगडित तथाकथित शापांच्या किंवदंती खऱ्याच असाव्यात याचा प्रत्यय लोकांना येऊ लागला.
egypt1
‘जो कोणी ही ममी उघडेल व राजाची समाधी भंग करेल, त्याचा मृत्यू उडत्या पंखांनी येईल’ अशी धोक्याची सूचना इजिप्शियन राजा तूतनखामेनची ममी ज्या ठिकाणी सापडली, त्या ठिकाणच्या प्रवेशद्वारापाशी कोरेलेली पुरातत्ववेत्त्यांना आढळली होती. पण या ममीचे अधिक संशोधन हाती घेतलेल्या पुरातत्ववेत्त्यांनी तूतनखामेनची ममी बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. आश्चर्य असे, की ही ममी बाहेर काढली जाण्याची प्रक्रिया सुरु असतानाच अनेक व्यक्तींचे गूढरित्या मृत्यू झाले. यामध्ये सर्वप्रथम सुप्रसिद्ध इजिप्टोलॉजिस्ट लॉर्ड कॅर्नार्व्होन यांचाही अचानक मृत्यू पावलेल्या व्यक्तींमध्ये समावेश होता. लॉर्ड कॅर्नार्व्होन आणि हावर्ड कार्टर यांनी तूतनखामेनची कबर सर्वप्रथम उघडली होती. या ममीचा शोध लागल्याच्या काही दिवसांच्या नंतर कॅर्नार्व्होन यांच्या गालवर किडा चावून झालेली जखम अचानक चिघळली आणि त्याच्या संसर्गामुळे त्यांचा मृत्यू झाला. तूतनखामेनचा मृत्यूदेखील त्याच्या गालवर किडा चावून त्यातून संसर्ग झाल्यामुळे झाल्याचे त्याच्या मृतदेहाच्या पाहणीमध्ये स्पष्ट झाले होते.
egypt2
हावर्ड कार्टर याने आपल्या इंगहॅम नामक मित्राला एका ममीचा ब्रेसलेट परिधान केलेला हात, पेपरवेट म्हणून भेट दिला होता. ही ममी ज्या शवपेटिकेमध्ये होती, त्यावर ‘जो ही ममी हलवेल, त्याला पाणी, अग्नी आणि कीटकांपासून धोका उत्पन्न होईल’ अशी धोक्याची सूचना कोरलेली होती. ही अजब भेटवस्तू इंगहॅमच्या घरामध्ये आल्यानंतर काही दिवसांमध्येच एका भीषण आगीमध्ये त्याचे घर जाळून खाक झाले. त्यानंतर मोठ्या कष्टाने, पुष्कळ पैसा खर्च करून इंगहॅमने पुन्हा आपले घर उभे केले खरे, पण काहीच दिवसांमध्येच मोठा पूर येऊन हे घर पुन्हा उध्वस्त झाले. या आणि अशा अनेक शापांमुळे अनेक लोकांनी आपले प्राण गमाविले.
egypt3
टायटॅनिक जहाजाला पहिल्याच सफरीच्या दरम्यान जलसमाधी मिळाली. या जहाजामध्ये काय काय सामान नेले जात होते याबद्दल अनेक आख्यायिका आहेत. या जहाजामध्ये खूप मोठा खजिना लपवून नेला जात असल्याचे कोणी म्हणते, तर अनेक आख्यायिकांच्या अनुसार या जहाजामध्ये एक ममी देखील नेली जात असल्याचे म्हटले जाते. याच ममीच्या शापामुळे जहाजाला अपघात होऊन जलसमाधी मिळाल्याचेही म्हटले जाते. या थियरीमध्ये किती तथ्य आहे, हा अर्थातच चर्चेचा विषय आहे.

Leave a Comment