… म्हणून या महिलेचा रात्रीचा मुक्काम चक्क टेलिफोन बूथमध्ये

booth
इंग्लंडमधील लायसेस्टरशर मधील एक महिला रात्रीची विश्रांती घेण्यासाठी चक्क एका टेलिफोन बूथमध्ये मुक्काम करीत असल्याचे दिसून आले आहे. एखादी लहानशी जागा भाड्यावर घेण्यासाठी द्यावी लागणारी आगाऊ रक्कम या महिलेला परवडण्यासारखी नसल्याने तिने हा उपाय शोधून काढला असल्याचे समजते. ही एकसष्ट वर्षीय महिला एका कारखान्यामध्ये पूर्ण वेळेची नोकरी करीत असून, तिथे तिला मिळणारा पगार अगदीच तुटपुंजा होता. या पगाराच्या जोरावर ही महिला एखाद्या बोर्डिंग हाऊस मध्ये केवळ दोन तीन दिवसच राहू शकत असे. पण या पेक्षा जास्त दिवस कुठेही राहणे या महिलेला परवडण्यासारखे नव्हते.
booth1
ही महिला कारखान्यामध्ये रात्रपाळीमध्ये काम करीत असून, तिच्या कामाचे तास संपल्यानंतर उरलेला काही वेळ विश्रांती घेण्यासाठी खोलीचे भाडे परवडण्यासारखे नसल्याने या महिलेने कामाच्या व्यतिरिक्त शिल्लक राहिलेली रात्र टेलिफोन बूथ मध्ये काढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कामाचे तास संपल्यानंतर ही महिला उरलेली रात्र टेलिफोन बूथमध्ये आणि दिवसाचा वेळ एखाद्या कॅफे किंवा एखाद्या पुस्तकालयामध्ये काढीत असे. लायसेस्टर मधील ‘हेल्प द होमलेस’ या संस्थेच्या एका कार्यकर्त्याशी झालेल्या भेटीमध्ये या महिलेने आपली कर्मकहाणी कथन केली आहे.
booth2
या संस्थेच्या तर्फे दर आठवड्याला बेघर व्यक्तींसाठी भोजन आयोजित केले जाते. भोजनासाठी ही महिला येथे आली असता तिची सर्व हकीकत कार्यकर्त्यांना समजली. या महिलेला या पूर्वीही भोजनासाठी आलेले पहिल्याने कार्यकर्त्यांनी तिची अधिक चौकशी केली असता त्यांना सर्व हकीकत समजली. ही महिला पूर्वी दुसऱ्या शहरात राहून तिथे नोकरी करीत असे. नोकरीतून निवृत्त झाल्यावर मिळत असलेल्या तुटपुंज्या पेन्शनवर गुजराण होणे अशक्य झाल्याने तिने लायसेस्टर येथे काम शोधण्यासाठी स्थलांतर केल्याचे सांगितले. तिचे वय अधिक असल्याने काम मिळणेही कठीण होते. अखेरीस काम मिळाले, पण त्यातून मिळणाऱ्या पगारामध्ये राहण्यासाठी जागा भाड्यावर घेणे परवडण्यासारखे नसल्याने अखेरीस फोन बूथमध्ये रात्रीचा मुक्काम करण्यावाचून इतर कोणताच पर्याय या महिलेकडे नव्हता.
booth3
तिची सर्व हकीकत जाणून घेतल्यानंतर ‘हेल्प द होमलेस’ या संस्थेने या महिलेला मदत करण्याचा निर्णय घेतला. या संस्थेच्या वतीने या महिलेसाठी ‘शेअरिंग’ बेसिस वर एक घर भाड्याने घेण्यात आले असून, या घराचे डिपॉझिट व एका महिन्याचे भाडे संस्थेच्या वतीने देण्यात आले असल्याने पुढील भाडे ही महिला आपल्या पगारातून देऊ शकेल इतपत मदत या संस्थेच्या वतीने करण्यात आली असल्याचे समजते.

Leave a Comment