वास्तूशास्त्रानुसार अशी असावी घरातील मास्टर बेडरूम

bedroom
दिवसभराची धावपळ संपवून सायंकाळी स्वस्थपणे विसावावे अशी जागा म्हणजे घरातील मास्टर बेडरूम. मास्टर बेडरूम घरामध्ये कशा प्रकारे असावी याबद्दल वास्तूशास्त्राने काही निश्चित नियम आखून दिले आहेत. या नियमांच्या अनुसार बेडरूमची रचना केली असल्यास या रूममध्ये वातावरण नेहमी सकारात्मक राहते. घरातील मास्टर बेडरूम दक्षिण-पश्चिम दिशेला असावी. ही दिशा स्थिरता, आणि बल देणारी आहे. बेडरूम मधील भिंतींचे, पडद्यांचे, तसेच बेडशीट्स इत्यादींचे रंग फार भडक न असता, सौम्य, मन प्रसन्न करणारे असावेत.
bedroom1
बेडरूम मधील बेडच्या बरोबर समोर आरसे असून नयेत. यामुळे बेडरूममध्ये वातावरण नकारात्मक राहत असल्याचे वास्तूशास्त्र सांगते. त्याचप्रमाणे बेडच्या खाली खूप सामान ठेवणे टाळावे. जर बेडच्या खाली सामान साठविण्यासाठी स्टोरेज असेल, तर त्यामध्ये ही सामानाची मांडणी व्यवस्थित केलेली असावी. तसेच बेडरूममध्ये अन्य सामानही खूप जास्त नसावे. एखाद्या खोलीमध्ये खूप सामान भरलेले असेल, तर त्या खोलीमध्ये सकारात्मक उर्जेचे संचरण व्यवस्थित होत नाही. त्यामुळे बेडरूममध्ये ही सामान अस्ताव्यस्त नसण्याची काळजी घ्यावी.
bedroom2
बेडरूमचा आकार शक्यतो चौकोनी किंवा आयताकृती असावा. तसेच बेडरूममध्ये कोणत्याही प्रकारची झाडे, रोपे लावू नयेत. बेडरूममधील पलंग शक्यतो मजबूत आणि लाकडी असावेत. लोखंडी किंवा स्टीलने बनलेले पलंग वापरणे शक्यतो टाळावे. सध्या घराच्या सजावटीमध्ये ‘बीम्स’चे चलन पुन्हा आले असले, तरी पलंगाच्या वरच्या बाजूला छतावर बीम्स असू नयेत. असे बीम पलंगाच्या वर, छतावर असल्यास त्यामुळे या बेडरूममध्ये विश्रांती घेणाऱ्याच्या बाबतीत आरोग्याशी निगडित समस्या उद्भवू शकत असल्याचे वास्तूशास्त्र म्हणते. त्याचप्रमाणे पलंग संपूर्णपणे भिंतीला टेकवून न ठेवता भिंतीपासून किमान चार इंच दूर असावा. तसेच पलंगाच्या बरोबर वरच्या बाजूला खिडकी असणार नाही अशा बेताने पलंग बेडरूम मध्ये ठेवलेला असावा.

Leave a Comment