कोहिनूरपेक्षाही मोठा ‘जेकब डायमंड’ नवी दिल्ली येथील राष्ट्रीय वस्तू संग्रहालयामध्ये प्रदर्शित

diamond
नवी दिल्ली येथील राष्ट्रीय वस्तूसंग्रहालयामध्ये हैद्राबादच्या निझामांची अनेक सुंदर आभूषणे आणि मौल्यवान रत्ने प्रदर्शित करण्यात आली असून, या प्रदर्शनाचे उद्घाटन सोमवारी, १८ फेब्रुवारी रोजी करण्यात आले. तब्बल बारा वर्षांच्या कालावधीनंतर ही आभूषणे व रत्ने प्रदर्शित करण्यात आली असून, यामध्ये १७३ मौल्यवान चीजवस्तूंचा समावेश आहे. या संग्रहामध्ये प्रसिद्ध ‘जेकब डायमंड’ या हिऱ्याचा देखील समावेश असून, हा हिरा कोहिनूर हिऱ्याच्या पेक्षा दुप्पट मोठा असल्याचे म्हटले जाते.
diamond1
निझामाच्या मौल्यवान रत्नांचे प्रदर्शन एकूण अठ्ठवीस दर्शनी पेट्यांमध्ये मध्ये करण्यात आले असून, यामध्ये अनेक मौल्यवान शिरपेच, रत्नजडीत हार, कमरबंद, ब्रेसलेट्स, कर्णाभूषणे, बाजूबंद, अंगठ्या, पॉकेट वॉचेस, रत्नजडीत बटने, कफलिंक्स इत्यादी वस्तूंचा समावेश आहे. या संग्रहामध्ये गोलकोंडाच्या खाणीतून मिळाले असलेले हिरे आणि कोलंबिया येथून आणविले गेलेले पाचू यांच्या जोडीनेच बर्मिज रुबी, म्हणजेच माणिके, आणि बसरा मोत्यांनी बनेविली गेलेली आभूषणेही प्रदर्शित करण्यात आली आहेत. अतिशय मौल्यवान असे बावीस पाचूही या प्रदर्शनामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.
diamond2
या पैकी सर्वात प्राचीन असलेली रत्नजडीत आभूषणे औरंगझेबाच्या काळामध्ये निझामाच्या ताब्यात आली असावीत असे तज्ञांचे मत आहे. औरंगझेबाने दख्खन प्रांतावर आपले अधिपत्य स्थापित केल्यानंतर ही आभूषणे निझामाच्या संग्रही आली असावीत असे म्हटले जाते. यामधील काही आभूषणे सतराव्या ते अठराव्या शतकाच्या दरम्यान घडविली गेली असून, यांना ‘आदिलशाही आभूषणे’ म्हटले जाते. तसेच या संग्रहामध्ये समाविष्ट असलेले पाचूंचे बाजूबंद टिपू सुलतानाचे असल्याचे ही म्हटले जाते. १९९५ साली भारत सरकारने खरेदी केलेला निजामांच्या आभूषणांचा संग्रह सर्वात मोठा असून या संग्रहाची किंमत २१८ कोटी रुपये होती. तत्पूर्वी हैद्राबादचे शेवटचे निझाम मीर ओस्मान अली यांनी स्थापित केलेल्या निझाम ज्वेलरी ट्रस्ट व निझाम सप्लीमेंट ज्वेलरी ट्रस्ट यांच्या ताब्यामध्ये हा आभूषणांचा संग्रह होता.
diamond3
या पूर्वी निझाम यांच्या आभूषणांचे प्रदर्शन २००१ साली व त्यानंतर २००७ साली भरविण्यात आले असून आता बारा वर्षांच्या काळानंतर हे प्रदर्शन पुन्हा एकदा आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन नवी दिल्ली येथील राष्ट्रीय वस्तु संग्रहालायामध्ये आयोजित केले गेले असून, पाच मे पर्यंत जनतेसाठी खुले राहणार आहे.

Leave a Comment