या जोडप्याने एकाच वर्षात केला बारा वेळा विवाह !

wedding
अनेकांना आयुष्यात एकदाच विवाह करणे हेच मोठे कठीण काम वाटते. विवाहासाठी जोडीदाराची निवड, खरेदी, नातेवाईक, आमंत्रणे, सजावटी, निरनिराळे विधी, भेटवस्तू, हे सर्व आटोपतानाच अनेकांच्या नाकी नऊ येत असतात. पण कॅलिफोर्निया मधील एका दाम्पत्याचा या बाबतीतला उत्साह मात्र वाखाणण्याजोगा आहे. या दाम्पत्याने एकाच वर्षातील बारा महिन्यांत, बारा निरनिराळ्या देशांमध्ये, बारा वेळा एकमेकांशी विवाह केला.
wedding1
केंजी आणि टेलर तानिगुची या दाम्पत्याचा विवाह सर्वप्रथम कॅलिफोर्निया येथे सर्व नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीमध्ये मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने पार पडला. त्यानंतर या दाम्पत्याने इटली, आयर्लंड, थायलंड, इस्राईल, क्युबा, इंडोनेशिया इत्यादी देशांमध्ये ही पुन्हा एकदा विवाह केला आहे. आपला विवाहसोहळा हा एखाद्या खास ठिकाणी व्हावा अशी टेलरची इच्छा होती. पण विवाह एखाद्या खास ठिकाणी होण्यासोबतच हा सोहळा टेलरच्या स्मृतीमध्ये कायमचा कोरला जावा यासाठी केंजीने निरनिराळ्या देशांमध्ये जाऊन पुन्हा पुन्हा विवाहबद्ध होण्याचा घाट घातल्याचे तो म्हणतो.
wedding2
कॅलिफोर्निया येथील विवाहसोहळ्यासाठी टेलरने आपल्या आजीचा वेडिंग ड्रेस परिधान केला असून, त्यानंतर इतर देशांमध्ये पार पडलेल्या प्रत्येक विवाहसोहळ्यासाठी मात्र टेलरने नवा गाऊन परिधान केला होता. पण त्यापायी अमाप पैसे खर्च न करण्याची काळजी ही टेलरने घेतली होती. टेलरच्या कोणत्याही पोशाखाची किंमत शंभर डॉलर्स पेक्षा अधिक नसून, यासाठी तिने आधीपासूनच पैशांची बचत केली असल्याचे समजते. तसेच टेलर एका प्रसिद्ध एअरलाईन कंपनीमध्ये कामाला असल्याने या जोडप्याचा प्रवासखर्चही सवलतीच्या दरामध्ये झाल्याने या सर्व विवाहसोहळ्यांसाठी या दाम्पत्याने फारसा खर्च न करता आपली जगावेगळ्या विवाहासोहळ्याची इच्छा पूर्ण करून घेतली आहे.

Leave a Comment