रस्त्यावरील पाण्याच्या डबक्यात आढळला दुर्मिळ प्रजातीचा बेडूक

frog1
रस्त्याच्या कडेला साचलेल्या पावसाच्या पाण्याच्या डबक्यात शास्त्रज्ञांना एक दुर्मिळ बेडूक सापडला असून, ही बेडकांची प्रजाती यापूर्वी प्राणीशास्त्राला परिचित नसल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. या प्रजातीचा बेडूक प्रथमच पाहिला गेला असून, दक्षिण भारतातील वायनाड जिल्ह्यामध्ये या बेडकाची ही प्रजाती आढळली आहे. बेडकांच्या या नव्या प्रजातीचे नाव शास्त्रज्ञांनी ‘मिस्टीसेलस’ असे ठवले असून, या बेडकाचा लहानसा आकार आणि ही प्रजाती अजूनपर्यंत अज्ञात असल्यामुळे हे लॅटिन नाव या प्रजातीला देण्यात आले आहे.
frog
वायनाड भागामध्ये नेहमीप्रमाणे फील्ड सर्व्हे करीत असताना दिल्ली विद्यापीठामध्ये डॉक्टरेट या पदवीसाठी संशोधन करीत असणाऱ्या विद्यार्थिनीला ही बेडकांची आजवर अज्ञात असलेली प्रजाती आढळली आहे. हा बेडूक लालसर रंगाचा असून, याच्या पोटावर ‘मार्बल पॅटर्न’ बनलेला आहे. फील्ड सर्व्हेच्या दरम्यान रस्त्याकडील एका पाण्याच्या डबक्यात हा बेडूक या विद्यार्थिनीला आढळला. त्यानंतर तिने जवळपासच्या भागामध्ये शोध घेतला असता, याच प्रजातीचे आणखी सुमारे दोनशे बेडूक तिच्या पाहण्यात आले आहेत. हा बेडूक सर्वप्रथम २०१५ साली आढळला होता.
frog2
या आजवर अज्ञात असलेल्या प्रजातीच्या शोधावरून प्राणीजगताविषयी आजच्या प्रगत काळामध्येही आपले ज्ञान अपुरेच असल्याचे ही विद्यार्थिनी म्हणते. बेडकांची ही प्रजाती वर्षातून फक्त चारच दिवस केवळ प्रजननासाठी बाहेर येत असून, उरलेले वर्षभर हे बेडूक लपून राहत असल्याने आजवर ही प्रजाती अज्ञात राहिली असल्याचेही या विद्यार्थिनीने म्हटले आहे. ज्या ठिकाणी हे बेडूक सापडले त्या ठिकाणी आता विशेष सुरक्षा उपलब्ध करविण्यात आली असून, या बेडकांची प्रजाती नष्ट होऊ नये यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत. ज्या ठिकाणी हे बेडूक सापडले तो भाग रहदारीचा असून, त्यामुळे ही प्रजाती नष्ट होण्याचा धोका लक्षात घेता ही विशेष व्यवस्था करण्यात आल्याचे समजते.

Leave a Comment