पाच वर्षांच्या चिमुरडीने पळविले रेल्वे स्थानकावरील सुरक्षा अधिकाऱ्यांच्या तोंडचे पाणी

Girl-five2

जगातील सर्वच विमानतळांवर, किंवा रेल्वे स्थानकांवर तेथील सुरक्षा प्रबंधांशी निगडित घडत असलेल्या घटना नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. अशीच एक घटना चीन देशातील शांगडोंग प्रांतामधील दामिन्घू रेल्वे स्टेशनवर घडली. या रेल्वे स्थानकावर प्रवाश्यांचे सामान एक्सरेच्या द्वारे पडताळून पाहण्याची प्रक्रिया सुरु असता, सुरक्षा अधिकाऱ्यांना एक्सरे मशीनच्या मॉनिटरवर चक्क एका लहान मुलीची आकृती दिसली. घडल्या प्रकाराने सुरक्षा अधिकारीही क्षणभर गोंधळून गेले. एक्सरे मशीनमधून बाहेर पडलेली पाच वर्षांची चिमुरडी पाहून सुरक्षा अधिकारीच नव्हे, तर तिथे उपस्थित सर्व प्रवासीदेखील स्तिमित झाले.
Girl-five1
घडले असे, की या चिमुरडीचे आईवडील आपल्या सामानाचे स्कॅनिंग करवीत असताना सामानाच्या सोबत ही चिमुरडी देखील आईवडिलांची नजर चुकवून एक्सरे मशीनमध्ये शिरली. आपले सामान स्कॅन करवून घेण्याच्या गडबडीमध्ये आपली मुलगी कुठे गेली आहे याकडे आईवडिलांचे लक्ष राहिले नाही, आणि तेच निमित्त साधून या चिमुरडीने हे उपद्व्याप केले. केवळ गंमत म्हणून या एक्स रे मशीनमध्ये चढलेल्या या चिमुरडीने सुरक्षा अधिकाऱ्यांच्या तोंडचे मात्र पाणी पळविले.
Girl-five
सुदौवाने या मुलीला कोणतीही इजा न होता ती एक्सरे मशीनमधून व्यवस्थित बाहेर पडली असल्याचे समजते. या एक्सरे मशीनमध्ये असलेल्या कन्व्हेयर बेल्टवर अनेक ठिकाणी खाचा तयार केलेल्या असतात. या खाचांमध्ये या मुलीचे कपडे अडकून तिला इजा होण्याचा धोका होताच, शिवाय एक्सरे मशीनमध्ये सामानाचे स्कॅनिंग होत असताना मशीनमधले किरणोत्सर्जनही या मुलीसाठी हानिकारक ठरू शकले असते. घडल्या प्रकाराने क्षणभर स्तिमित झालेल्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी नंतर मुलीच्या आईवडिलांना त्यांच्या निष्काळजीपणाबद्दल समज दिली असल्याचे समजते.