तुरुंगवास भोगत असताना या कैद्याने केले सतरा कोर्सेसचे प्रशिक्षण पूर्ण

t
अलिगढ येथील जिल्हा कारागृहामध्ये हत्या आणि दरोड्याच्या गुन्ह्याबद्दल शिक्षा भोगणाऱ्या एका कैद्याने आपल्या गुन्हेगारी प्रवृत्तीचा त्याग करीत ज्ञानाकडे वाटचाल सुरु केली आहे. सातत्याने शिक्षण घेत आणि आपल्याकडे असलेल्या ज्ञानाने इतरांची आयुष्येही बदलण्याचा ध्यास या कैद्याने घेतला आहे. अलिगढ कारागृहामध्ये असलेल्या इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीच्या (IGNOU) स्टडी सेंटरच्या माध्यमातून या कैद्याने तब्बल सतरा निरनिरळ्या कोर्सेसचे प्रशिक्षण यशस्वी रित्या पूर्ण केले असून, ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये सर्वाधिक कोर्सेसचे प्रशिक्षण घेतल्याचा विक्रम नोंदविण्याच्या तयारीत हा कैदी आहे. इग्नूद्वारे चालविल्या जाणाऱ्या कोर्सेससाठी सध्या देशभरातील कारागृहांमधून एकूण चौदाशे कैदी निरनिरळ्या कोर्सेसचे प्रशिक्षण घेत आहेत.

२००५ साली नागौला गावामध्ये राहणाऱ्या राजारामचे आयुष्य ठीकठाकच सुरु होते. २००५ साली राजारामला हत्या आणि दरोड्याच्या आरोपांवरून अटक झाली. एक वर्ष तुरुंगामध्ये राहिल्यानंतर राजारामला जामीन मिळाला. त्यानंतर २०१३ साली राजारामवर लावले गेलेले सर्व आरोप सिद्ध होऊन त्याला तुरुंगवासाची शिक्षा झाली. तेव्हापासून राजाराम अलिगढच्या कारागृहात आहे. कारागृहाच्या कणखर भिंती, येथील वातावरण खरे तर एखाद्याला नैराश्याच्या गर्तेमध्ये लोटून देण्यास समर्थ असतात, मात्र राजरामने आपले मन कणखर करीत आपला भूतकाळ विसरण्याचे ठरविले आणि आपण केलेल्या पापांचे परिमार्जन करून आयुष्याला नवी दिशा देण्याच्या उद्देशाने राजारामने ज्ञानसंपादनाचा मार्ग स्वीकारला.

सध्या राजरामचे वय ५८ वर्षांचे असून, कारागृहामध्ये येण्यापूर्वी त्यांनी बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर ‘इग्नू’च्या कारागृहातील स्टडी सेंटरच्या माध्यामातून राजारामने एकूण सतरा कोर्सेसचे प्रशिक्षण पूर्ण केले असून, आणखी पाच कोर्सेस पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरु आहे. जिल्हा कारागृहातील कोणत्याही कैद्याने आजवर इतके शिक्षण प्राप्त केले नसून, इतके कोर्सेस यशस्वीरित्या पूर्ण करणारा राजाराम पहिलाच कैदी आहे. आपल्या यशाचे श्रेय राजराम, कारागृहातील अधिकाऱ्यांना देत असून, त्यांच्या प्रोत्साहनामुळे इतके शिक्षण घेणे शक्य झाले असल्याचे राजाराम म्हणतात. सध्या राजारामकडे कारागृहातील पुस्तकालय सांभाळण्याची जबाबदारी दिली गेली आहे. राजारामने पूर्ण केलेल्या कोर्सेसमध्ये डिझास्टर मॅनेजमेंट, टूरिझम, एनजीओ मॅनेजमेंट, एचआयव्ही अँड फॅमिली एज्युकेशन, फूड अँड न्युट्रीशन, ह्युमन राईट्स, कोर्पोरेट अँड बिझिनेस लॉ, हेल्थ केअर अँड वेस्ट मॅनेजमेंट इत्यादी कोर्सेसच्या डिप्लोमाचा समावेश आहे.

Leave a Comment