‘ही’ आहेत पाकिस्तानातील काही प्रसिद्ध हिंदू मंदिरे

pakistani-hindu-temple0

हिंदू धर्म हा विश्वातील सर्वात प्राचीन धर्मांपैकी एक असून या धर्माचे पालन करणारे लोक केवळ भारतातच नाही, तर भारताबाहेरही अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. ज्या काळी भारताची फाळणी झाली नव्हती तेव्हा त्या प्रांतामध्ये असलेली अनेक प्राचीन मंदिरे आता फाळणीनंतर पाकिस्तानमध्ये गेली असली, तरी आजही यातील काही हिंदू मंदिरांचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्व टिकून आहे. या मंदिरांविषयी जाणून घेऊ या. पाकिस्तानामध्ये असलेल्या हिंदू मंदिरांबद्दल बोलायचे झाले, तर येथील शक्तीपिठाचा उल्लेख आवर्जून करायला हवा. पाकिस्तानच्या अधिपत्याखाली असणाऱ्या बलुचिस्तान मध्ये असणारे, आदिशक्तीला समर्पित असणारे हे मंदिर ‘हिंगलाज माता मंदिर’ या नावाने ओळखले जाते.
pakistani-hindu-temple
या मंदिराच्या देखभालीचे काम येथील हिंदू समुदायाच्या जोडीने येथील मुस्लीम बांधवही मोठ्या श्रद्धेने करीत असतात. हे स्थान दैवी चमत्काराची शक्ती लाभलेले आहे अशी येथे येणाऱ्या भाविकांची श्रद्धा आहे. वैष्णोदेवी मंदिराप्रमाणेच हे मंदिरही डोंगरावर, एक गुहेमध्ये आहे. येथे पोहोचण्यासाठी दुर्गम रस्त्यातून वाट काढीत भाविकांना येथवर पोहोचावे लागते.
हिंगला नदीच्या किनारी सुंदर डोंगरांच्या सान्निध्यात असणाऱ्या या मंदिराचा इतिहास दोन हजार वर्षांपूर्वीचा आहे. एका पौराणिक कथेच्या अनुसार भगवान विष्णुंच्या सुदर्शन चक्राचा आघात होऊन देवी सतीचे शिर या ठिकाणी पडले होते. त्यामुळे हे ठिकाण चमत्कारी म्हटले जाते. या मंदिराला स्थानिक लोक ‘नानी का मंदिर’ किंवा ‘नानी का हज’ या नावाने देखील ओळखतात. ब्रह्मवैवर्त पुरणाच्या अनुसार जो भाविक या देवीचे दर्शन घेतो, त्याच्या पूर्वजन्मीची पापे नष्ट होत असून, त्याला जन्ममृत्युच्या चक्रातून मुक्ती मिळते.
pakistani-hindu-temple4
पाकिस्तानातील कराचीमध्ये असलेले हनुमान मंदिर गेली अनेक शतके इथे असून या मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांची प्रत्येक मनोकामना पूर्ण होते अशी या मंदिराची ख्याती आहे. मंगळवार आणि शनिवारच्या दिवशी या मंदिरामध्ये भाविक मोठ्या संख्येने दर्शनाला येत असतात. या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी केवळ पाकिस्तानातील हिंदू धर्मीयच नाही, तर अनेक भाविक भारतातूनही या मंदिरामध्ये श्री हनुमानाचे दर्शन घेण्यासाठी जात असतात. या मंदिरातील संकटमोचन हनुमानाची मूर्ती ही अनेक शतकांपूर्वी जमिनीखालून प्रकट झाली असल्याची आख्यायिका आहे.
pakistani-hindu-temple.jpg2
पाकिस्तानातील पंजाब प्रांतामधील चकवाल जिल्ह्यातील शिवमंदिराचे निर्माण सहाव्या ते नवव्या शतकादरम्यानच्या काळामध्ये केले गेले होते. चकवाल गावापासून सुमारे चाळीस किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या कटस नामक पहाडावर हे मंदिर स्थित आहे.
pakistani-hindu-temple3
महाभारताच्या काळात युधिष्ठीर आणि यक्षांच्या मध्ये याच ठिकाणी संवाद झाले असल्याचा उल्लेख पुराणांमध्ये आहे. या मंदिराला कटसराज मंदिर या नावाने ओळखले जात असून, या मंदिरामध्ये असलेले कुंड साक्षात शिवाच्या अश्रूंनी बनलेले असल्याची आख्यायिका इथे आहे.
pakistani-hindu-temple1
देवी सतीच्या मृत्युनंतर भगवान शिवशंकरांनी विलाप केला असता, त्या अश्रूंनी हे कुंड भरून गेल्याची ही आख्यायिका आहे. या मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांसाठी या कुंडामध्ये स्नान करण्याचे महत्व मोठे आहे.
pakistani-hindu-temple5
सिंध प्रांतातील थारपारकर जिल्ह्यातील थारी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेले गौरी मातेचे मंदिर हिंदूधर्मियांसाठी महत्वाचे तीर्थस्थळ आहे. या मंदिरामध्ये एक विहीर असून ही विहीर देवीच्या कृपेने कधीही कोरडी पडत नाही अशी भाविकांची मान्यता आहे. तसेच मुलतान मध्ये वैष्णवांचे श्रद्धास्थान असलेले नरसिंह मंदिर आहे. हिरण्यकश्यप राक्षसाचा संहार करण्याकरिता भगवान विष्णू नरसिंहाच्या अवतारात याच ठिकाणी प्रकट झाल्याची आख्यायिका आहे. मुलतान हा शब्द ‘मूल स्थान’ शब्दाचा अपभ्रंश असल्याचे म्हटले जाते. या ठिकाणी भगवान नरसिंहाचे देवस्थान असून, या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते.

 

Leave a Comment