असे आहेत मुंबईच्या ताजमहाल पॅलेस हॉटेलमधील आलिशान निवासी कक्ष

taj-h2

मुंबईच्या प्रसिद्ध पंचतारांकित ताजमहाल पॅलेस हॉटेल येथील आलिशान ‘अल्ट्रा लक्झरी रूम्स’ मध्ये राहण्याचा अनुभव राजेशाही असेल यात नवल ते काहीच नाही. मात्र हा अनुभव घेण्यासाठी येथे येणाऱ्या पाहुण्यांना या आलिशान कक्षामध्ये एक दिवस राहण्यासाठी भरपूर किंमतही मोजावी लागते. या हॉटेलमध्ये येणाऱ्या पाहुण्यांसाठी इथे अनेक ‘अल्ट्रा लक्झरी’ कक्ष आहेत. त्यांपैकी ‘टाटा सुईट’ हा कक्ष या हॉटेलमधील ‘प्रेसिडेंशियल सुईट’ असून, सुमार पाच हजार स्क्वेअर फुटांचा या कक्षाचा विस्तार आहे. या सुईटमध्ये एकूण सोळा रूम्स असून, येथे कामानिमित्त भेटावयास येणाऱ्या मंडळींसाठी मीटिंग रूम, व खासगी डायनिंग रूम आहे. या सुईटमध्ये राहण्यास येणाऱ्या पाहुण्यांना त्यांचे मनपसंत खाद्यपदार्थ खाऊ घालण्यासाठी खासगी शेफ आणि इतर सेवेसाठी खासगी सहायकाची देखील सोय करविण्यात आली आहे.

taj-h1
या सुईटमध्ये खासगी जिम आणि स्पा ची देखील व्यवस्था आहे. त्याचबरोबर एक स्टडी रूम, आणि बोर्ड रूमची सुविधा देखील येथे पुरविण्यात आली आहे. या सुईट मध्ये एक आलिशान मास्टर बेडरूम असून याशिवाय एक अतिरिक्त शयनकक्षही आहे. या आलिशान मास्टर बेडरूममधून गेटवे ऑफ इंडिया आणि त्याचबरोबर अथांग समुद्राचे दर्शन घडते.

taj-h

या राजेशाही सुईटमध्ये राहण्यासाठी येणाऱ्या पाहुण्यांना येथे एका दिवसाचे तब्बल बारा लाख रुपये मोजावे लागतात. आजवर टाटा सुईटमधे अनेक नामवंत मंडळी वास्तव्यास आली आहेत. अमेरिकेचे पूर्वराष्ट्रपती बराक ओबामा, कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन त्रूडो, टॉम क्रुझ आणि मडोना सारखे नामवंत हॉलीवूड सेलिब्रिटीज, या मंडळींनी या सुईटमध्ये वास्तव्य केले आहे.

taj-h3
टाटा सुईटच्या जोडीनेच रवी शंकर सुईटही तितकाच आलिशान आहे. सुप्रसिद्ध सतारवादक पंडित रवी शंकर यांच्या नावावरून या कक्षाचे नाव देण्यात आले आहे. हा कक्ष ११०० स्वेअर फुटांच्या जागेमध्ये विस्तारलेला असून, हा दुमजली सुईट आहे. या सुईटमध्ये राहण्यासाठी येथे येणाऱ्या पाहुण्यांना एका दिवसासाठी सहा लाख रुपये मोजावे लागतात. या सुईटमध्ये आजवर अनेक हॉलीवूड आणि बॉलीवूड सेलिब्रिटीज वास्तव्यास आल्या आहेत. या हॉटेलमधील राजपूत सुईटमधे राहण्यासाठी देखील पाहुण्यांना एका दिवसासाठी पाच ते सहा लाख रुपये खर्च करावे लागतात. खास राजस्थानच्या शाही धाटणीने या सुईटची सजावट करण्यात आली असून, येथील शयनकक्षाच्या छतावर केली गेलेली आरश्यांची सजावट या सुईटची खासियत आहे.

Leave a Comment