जपानमधील हे शहर ठरत आहे ‘झीरो वेस्ट’ निर्मितीसाठी प्रसिद्ध

Zero-Waste2

जपानमधील हे शहर आता जवळ जवळ ‘शून्य कचरा’, म्हणजेच ‘झीरो वेस्ट’ निर्मिती करीत आहे. कामीकात्सु या जपानी शहरामध्ये बहुतेक सर्वच वस्तूंचा शक्यतो पुनर्वापर होतो, किंवा ती वस्तू ‘recycle’ केली जाते. त्यामुळे या शहरामध्ये टाकाऊ वस्तूंचा कचरा जवळ जवळ नाहीच. पण पूर्वी परिस्थिती आताच्या काळाच्या मानाने फार वेगळी होती. पूर्वी टाकाऊ वस्तू डम्पिंग यार्डमध्ये टाकून दिल्या जात असत, किंवा कचरा जाळला जात असे. पण दैनंदिन जीवनामध्ये प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर वाढल्यानंतर या वस्तू नुसत्याच टाकून देणे किंवा जाळणे अशक्य झाले. त्यामुळे या टाकाऊ वस्तूंचे करायचे काय हा प्रश्न स्थानिक प्रशासनासमोर उभा ठाकला असता, सुमारे वीस वर्षांपूर्वी या प्रश्नावर तोडगा शोधून काढण्यात आला.

Zero-Waste3
वीस वर्षांपूर्वी कामिकात्सू या शहराने नवी उपाययोजना राबवत २०२० सालापर्यंत शहर पूर्णपणे ‘झीरो वेस्ट’ करण्याचा निश्चय केला. त्यानुसार शहरातील सर्व नागरिक आता त्यांच्या घरांमधील किंवा कार्यालयांमधील टाकाऊ वस्तूंचा कचरा शहरातील एकाच कलेक्शन सेंटरमध्ये घेऊन येतात. त्यापुढे या कचऱ्यातील वस्तूंचे पंचेचाळीस निरनिराळ्या गटांमध्ये वर्गीकरण केले जाते. यामध्ये धातूंनी बनलेल्या वस्तू, त्या कोणत्या धातूने बनविल्या गेल्या आहेत हे पाहून त्यांचे वर्गीकरण केले जाते. म्हणजेच अॅल्युमिनियमने, स्टीलने बनलेल्या वस्तू, किंवा लोखंडाने बनलेल्या टाकाऊ वस्तूंचे, त्या त्या धातु प्रमाणे वर्गीकरण केले जाते. कागदाच्या बाबतीत बोलायचे झाले, तर वर्तमानपत्रे, कार्डबोर्ड, किंवा कागदाची खोकी यांचे वर्गीकरण वेगवेगळे होते. तसेच प्लास्टिकच्या वस्तू, काचेच्या वस्तू, कपडे यांचे ही वर्गीकरण केले जाते. त्यानंतर या वस्तू recycle केल्या जातात.

Zero-Waste1
ही उपाययोजना नव्याने राबविण्यास सुरुवात होत असताना ही कितपत प्रभावी ठरणार आहे याबद्दल अनेकांच्या मनामध्ये शंका होती. एक तर कलेक्शन सेंटर पर्यंत कचरा घेऊन जाणे आणि त्यांनतर या कचऱ्याचे इतक्या प्रकारे वर्गीकरण करणे हे काम मेहनतीचे होते. पण जसजशी ही नवी सवय लोकांच्या अंगवळणी पडत गेली, तसतसे याचे फायदेही लोकांच्या लक्षात यायला लागले.

Zero-Waste

कालांतराने ‘झीरो वेस्ट’ची ही कल्पना लोकप्रिय झाली, आणि त्याचबरोबर ही कल्पना कशा प्रकारे राबविली जात आहे हे पाहण्यासाठी आता या लहानशा शहराला मुद्दाम भेट देण्यासाठी इतर शहरातील लोकांची गर्दी होऊ लागली आहे. पर्यटकांची संख्या वाढल्याचा फायदा स्थानिक व्यावसायिकांनाही होत आहे. त्याचबरोबर एका लहानशा शहरातील लोकांनी एकत्र येऊन एखादी योजना राबविण्याचे ठरविल्यास त्याचा होणारा मोठा लाभही पर्यटक अनुभवत आहेत.

Leave a Comment