बोन्सायची चोरी करणाऱ्या चोरांना बोन्सायच्या मालकिणीचा फेसबुकवर संदेश

fb

फुयुमी लिमुरा नामक महिला जपानमधील टोकियो शहराची निवासी असून, तिच्या घराच्या बाहेरच तिचे मोठे, अतिशय सुंदर बोन्साय गार्डन आहे. या बोन्साय गार्डनमध्ये तिच्या पतीने व तिने मिळून निरनिराळ्या वृक्षांचे बोन्साय अतिशय हौशीने विकसित केले आहेत. एखाद्या वृक्षाचे बोन्साय विकसित करणे आणि त्याची देखभाल करणे हे अतिशय कौशल्याचे काम असून, बोन्साय विकसित करण्याची, त्यांची देखभाल करण्याची परंपरा फुयुमीच्या पतीच्या परिवारामध्ये गेल्या अनेक पिढ्यांपासून आहे. फुयुमीच्या संग्रही काही वर्षे जुन्या असणाऱ्या बोन्साय पासून अनेक दशकांपूर्वी विकसित केल्या गेलेल्या बोन्साय पर्यंत अनेक बोन्साय आहेत.

t1
मात्र काही दिवसंपूर्वी फुयुमीच्या बोन्साय गार्डनमधून एक अतिशय सुंदर बोन्साय चोरीला गेले. हे बोन्साय चारशे वर्षे जुने असून, बाजारामध्ये या बोन्सायची किंमत हजारो डॉलर्स आहे. आपल्या बगीच्यातील गेल्या अनेक पिढ्यांनी इतके वर्षांपासून देखभाल केलेले बोन्साय अशा प्रकारे गायब झाल्याने फुयुमी आणि तिचे परिवारजन अतिशय कष्टी झाले आहेत. सीएनएन वृत्तवाहिनीने या संदर्भात प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार हे बोन्साय अतिशय दुर्मिळ असणाऱ्या बोन्सायपैकी एक असल्याचे समजते.

t
आपल्या संग्रही असलेल्या बोन्सायपैकी एक बोन्साय अचानक हरविण्याचे दु:ख एखादे मूल हरविल्याप्रमाणेच असल्याचे फुयुमी म्हणते. ज्याने कोणी या बोन्सायची चोरी केली असेल, त्याच्या नावे फुयुमीने फेसबुक द्वारे एक संदेशही प्रसिद्ध केला आहे. या संदेशामध्ये बोन्सायची काळजी कशा प्रकारे घेतली जावे यासंबंधी सूचना फुयुमीने दिल्या आहेत. ‘ज्याने कोणी हे बोन्साय आपल्यासोबत नेले असेल, त्याने या बोन्सायला नियमित पाणी घालावे, कारण पाण्याच्या अभावी हे बोन्साय विकसित करण्यामागची अनेक वर्षांची मेहनत धुळीला मिळेल’ असा संदेश फुयुमीने बोन्सायचोरासाठी पाठविला आहे. तसेच हे बोन्साय चारशे वर्ष जगले असून, पाण्याची अभावी ते एक आठवडा ही जगू शकणार नसल्याचेही फुयुमीने आपल्या संदेशामध्ये म्हटले आहे.

t2
चोरीला गेलेले हे बोन्साय अतिशय दुर्मिळ अशा ‘शिम्पाकू’ नामक जुनिपरचे असून, या बोन्सायची जर व्यवस्थित निगा राखली गेली तर ही बोन्साय अनेक दशके टिकून राहत असल्याचे फुयुमी म्हणते. ज्या व्यक्तींनी फुयुमीच्या बोन्साय गार्डनमधून शिम्पाकू बोन्साय चोरले त्यांनी या बोन्साय बरोबरच इतरही सहा बोन्साय या बागेतून लांबविले आहेत. या घटनेमुळे फुयुमीचे परीवारजन अतिशय दु:खी झाले असून, त्यांच्या परिवारातील कोणी तरी त्यांच्यापासून लांब गेल्याप्रमाणे त्यांना वाटत आहे. फुयुमीचे पती सेजी लिमुरा हे निष्णात बोन्साय मास्टर असून, गेल्या पाच पिढ्या त्यांच्या परिवारातील मंडळी बोन्साय विकसित करण्यात कुशल असल्याचे समजते.

Leave a Comment