भविष्यामध्ये उद्भवू शकणारी पूर परिस्थिती टाळण्यासाठी बँकॉकने शोधला असा पर्याय

bangkok-flood-park

बँकॉक शहरामध्ये अलीकडच्या काळामध्ये एक नाविन्यपूर्ण पार्क बनविण्यात आले असून, हे पार्क बनविले जाण्यामागे एक निश्चित उद्देश आहे. बँकॉक शहराला भविष्यकाळामध्ये पूरपरिस्थितीपासून उद्भविणारा धोका लक्षात घेता या पार्कची निर्मिती करविण्यात आली आहे. २०५० सालापर्यंत हे शहर पूरपरिस्थितीला सामोरे जाण्याचा धोका चारपटीने वाढला असून, याच संकटाला तोड देण्यासाठी या आगळ्यावेगळ्या पार्कची निर्मिती करण्यात आली आहे.

bangkok-flood-park1
या पार्कच्या निर्मितीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला गेला असून, या पार्कच्या भूपृष्ठाखाली विशालकाय हौद बांधण्यात आले आहेत. पावसाचे पडणारे पाणी या जमिनीखालील हौदांमध्ये साठत असून, या पाण्याचा वापर पार्कमधील वनराई आणि हिरवळीच्या देखभालीसाठी केला जातो. हा हौद पूर्ण भरल्यास यामध्ये साठलेले पाणी संपूर्ण पार्कसाठी वीस दिवस पुरेल इतके असते. या हौदांमध्ये एकूण ३.८ मिलियन लिटर पाणी साठविले जात असून, हे प्रमाण एका अमेरिकन फुटबॉल फील्डमध्ये एक मीटर खोलीइतके पाणी जितके असेल, तेवढे आहे.

bangkok-flood-park2
सध्या जगभरातच अनुभविल्या जाणाऱ्या ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम अलीकडच्या काळामध्ये दक्षिण-पूर्व आशिया खंडातील देशांनाही भेडसावत असून, या देशांमध्ये अलीकडच्या काळामध्ये अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती अनेकदा उद्भवत असते. २०४० सालापर्यंत अतिवृष्टीचे प्रमाण अधिक वाढण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली असून, त्यामुळे समुद्रांच्या पाण्याच्या पातळीमध्ये ही सरासरी वीस सेंटीमीटरपर्यंत वाढ होणार असल्याचा शास्त्रज्ञांचा कयास आहे. त्याचबरोबर बँकॉक सारखी अनेक शहरे पाण्याखाली जाण्याचीही शक्यता वर्तविली गेली आहे.

बँकॉक आणि इतर अनेक शहरांमध्ये झपाट्याने होणारे औद्योगिकरण आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन त्यानुसार जमीन पुरविली जात असून त्यावर सातत्याने बांधकामे केली जात असल्याने पावसाचे पाणी झिरपण्यासाठी फारशी जमीन या शहरांमध्ये शिल्लक उरली नाही. म्हणूनच भविष्यामध्ये सातत्याने अतिवृष्टी झालीच तर ते पाणी वाहून जाण्यासाठी या शहरांमध्ये जागाच नसल्याने पूरपरिस्थिती उद्भविण्याचा धोका अधिक आहे. त्यादृष्टीने जमिनीखाली विशालकाय हौद बांधले जाऊन पावसाचे पाणी त्यांमध्ये साठू देण्याची कल्पना पूरपरिस्थिती पुष्कळ अंशी टाळू शकणार आहे. किंबहुना अशा प्रकारचे हौद जमिनीखाली बांधले जाणे ही भविष्यकाळाची गरज ठरणार असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

Leave a Comment