ओडिशातील दृष्टीहीनांना स्पर्शाद्वारे अनुभवता आले प्राचीन वास्तुकलेचे सौंदर्य

odisha1
भारतामध्ये अनेक ऐतिहासिक प्राचीन वास्तू आहेत. या वास्तू प्रत्यक्षात पाहण्यासाठी केवळ देशभरातूनच नाही, तर विदेशांतूनही पर्यटक लाखोंच्या संख्येने भारतामध्ये येत असतात. अतिशय प्राचीन, भव्य, आणि सुंदर वास्तुकलेने आणि शिल्पकलेने नटलेल्या या वास्तू पाहण्याचे सुख दृष्टीहीनांच्या वाट्याला मात्र कधी येत नाही. भारतातील शिल्पकलेचा आणि वास्तुकलेचा इतिहास या व्यक्तींना केवळ ऐकूनच माहिती असतो. पण आता हे दृश्य बदलताना दिसत आहे. एका आगळ्या वेगळ्या उपक्रमाच्या अंतर्गत ओडिशा राज्याच्या भुवनेश्वरमधील मुक्तेश्वर मंदिराने आपले दरवाजे दृष्टीहीन विद्यार्थांसाठी खुले केले आहेत. त्यामुळे कलिंग साम्राज्यकालीन या मंदिराची भव्य, सुंदर वास्तुकला, येथील शिल्पे या विद्यार्थांना नजरेतून अनुभवता आली नसली, तरी स्पर्शातून अनुभवता आली.
odisha
या दृष्टीहीन विद्यार्थांना मुक्तेश्वराचा प्राचीन इतिहास ऐकून माहिती होता, पण या आगळ्यावेगळ्या हेरीटेज वॉकच्या माध्यमातून या विद्यार्थांना येथील वास्तुकला, शिल्पकला स्पर्शातून अनुभविण्यास मिळाली. तसेच या मंदिराचा इतिहास, या मंदिराची संस्कृती, येथील परंपरा यांची माहिती देणारी पुस्तिका ब्रेल लिपीतून उपलब्ध करविली गेली असल्याने विद्यार्थ्यांना ही माहिती सहजगत्या उपलब्ध होऊ शकली. हा उपक्रम ओडिशा राज्याच्या ‘सेन्ट्र फॉर यूथ अँड सोशल वेल्फेअर’च्या वतीने आयोजित करण्यात आला असून, याला ‘इंडिया हेरीटेज वॉक फेस्टिव्हल’ असे नाव देण्यात आले आहे.
odisha2
या उपक्रमामध्ये सह्भागी झालेले दृष्टीहीन विद्यार्थी ओडिशा राज्याच्या निरनिराळ्या प्रांतांतून आले असून, सुप्रसिद्ध पुरातत्ववेत्ते जीतू मिश्रा यांच्याशी या निमित्ताने भारतीय इतिहास आणि स्थापत्यकला या विषयावर विद्यार्थ्यांनी संवाद साधला. प्राचीन मंदिरे आणि वस्तूसंग्रहालये आपल्या संस्कृतीचे प्रतीक आहेत. पण बहुतेकवेळी हे पाहण्यासाठी येणाऱ्या लोकांकरवी या वस्तूंना किंवा वास्तूला धोका उत्पन्न होण्याच्या भीतीपोटी या वस्तूंना स्पर्श करण्यास मनाई करण्यात येते. पण दृष्टीहीन लोकांना या वस्तू स्पर्शातून अनुभविण्याची, समजून घेण्याची संधी दिली तर हा अनुभव त्यांच्यासाठी नक्कीच वेगळा ठरेल असे मत ‘सेंटर फॉर यूथ अँड सोशल वेल्फेअर’चे जनरल सेक्रेटरी नितुरंजन दाश यांनी या निमित्ताने बोलताना व्यक्त केले.