सलग सात दिवसांत सात मॅरथॉन्स पूर्ण करून ब्रिटीश मॅरथॉनरचा नवा जागतिक विक्रम

British-runne
एका महिला धावपटूची अतिशय धाडसी महत्वाकांक्षा आता एका नव्या जागतिक विक्रमामध्ये परिवर्तित झाली आहे. ब्रिटीश मॅरथॉनर सुसाना गिल हिने सलग सात दिवसांमध्ये, सात महाखंडांमध्ये आयोजित, सात मॅरथॉन्स पूर्ण करून नवा जागतिक विक्रम केला आहे. या ‘वर्ल्ड मॅरथॉन चॅलेंज’मधील सर्व मॅरथॉन्स सर्वात कमी वेळामध्ये पूर्ण करणारी सुसाना प्रथम महिला मॅरथॉन धावपटू ठरली आहे. या चॅलेंज ला ‘777’ चॅलेंजही म्हटले जाते.

इंग्लंडमधील लंडन शहराची नागरिक असलेल्या चौतीस वर्षीय सुसानाला या सात मॅरथॉन्समध्ये कुठे जीवघेण्या थंडीला तोंड द्यावे लागले तर कुठे भयंकर उकाड्याला तोंड देत मॅरथॉन पूर्ण करावी लागली. सुसानाने -३५ अंशामध्ये कडाक्याच्या थंडीचा सामना करीत अंटार्क्टिकामधील मॅरथॉन पूर्ण केली, आणि त्यानंतर ३५ अंश तापमान असलेल्या केप टाऊन येथील मॅरथॉनही यशस्वीरित्या पूर्ण केली. या सात मॅरथॉन्सच्या शृंखलेचा शेवट मायॅमी येथील ‘फिनिशिंग इव्हेंट’मध्ये झाला असून, सुसानाला सर्व सात मॅरथॉन्स पूर्ण करण्यासाठी एकूण चोवीस तास एकोणीस मिनिटे आणि अठ्ठावीस सेकंदांचा अवधी लागला. या सातही मॅरथॉन्समधील प्रत्येक मॅरथॉन सुसानाने सुमारे तीन तास अठ्ठावीस मिनिटांच्या अवधीमध्ये पूर्ण केली.

या पूर्वीचा ‘वर्ल्ड मॅरथॉन चॅलेंज’चा विक्रम सुसानाने तब्बल तीन तासांच्या फरकाने मोडला असून, हे ‘चॅलेंज’ स्वीकारण्याची तिची महत्वाकांक्षा अतिशय धाडसी असली, तरीही ती पूर्ण करण्याची अनिवार इच्छा असल्याचे सुसाना सांगते. दहा वर्षांपूर्वी केवळ लंडन मॅरथॉनमध्ये सहभागी होण्याची आपली इच्छा असल्याचे सांगून आता दहा वर्षांच्या नंतर मॅरथॉन्सच्या निमित्ताने आपण जगभ्रमंती करीत असल्याचे सुसाना म्हणते. सुसानाने पूर्ण घेतलेल्या ‘वर्ल्ड मॅरथॉन चॅलेंज’मध्ये सहभागी होण्यासाठी धावपटूंची शारीरिक क्षमता आणि मनोधैर्य अतिशय उच्चकोटीचे असावे लागते. त्याच कारणामुळे आजवर दोनशे हूनही कमीच धावपटू हे वर्ल्ड चॅलेंज पूर्ण करू शकले आहेत. हे चॅलेंज सर्वप्रथम २००३ साली सर राल्फ फिएने यांनी पूर्ण केले होते.

या मॅरथॉन चॅलेंजमध्ये सहभागी होण्यासाठी प्रत्येक धावपटूला ३६,००० पाउंड्स इतकी एन्ट्री फी द्यावी लागत असून, यामध्ये सर्व ठिकाणी पोहोचण्यासाठी चार्टर्ड विमान, राहण्याची व भोजनाची सोय, वैद्यकीय सुविधा आणि इतर सुविधांचा समावेश आहे. हे मॅरथॉन चॅलेंज पूर्ण करण्यासाठी हे धावपटू जगभर सुमारे ५५,००० मैलांचा हवाई प्रवास करतात. या सात मॅरथॉन्स अंटार्क्टिका, केप टाऊन, पर्थ, दुबई, मॅड्रीड, सॅन् टियागो, आणि मायॅमी येथे आयोजित केल्या जात असून, सात दिवसांच्या कालावधीमध्ये या सर्व मॅरथॉन्स धावपटूंनी पूर्ण करायच्या असतात. सातत्याने प्रवास, हवामानातील फरक, आणि झोपेचा, विश्रांतीचा अभाव यामुळे या सर्व मॅरथॉन्स पूर्ण करणे हे धावपटूंच्या समोरील मोठे आव्हान असते.

Leave a Comment