व्हॅलेंटाइन्स डेच्या निमित्ताने पूर्वप्रेमिकांसाठी ‘अशी’ही भेट देण्याची संधी

valentine
सध्या जगभरामध्ये व्हॅलेंटाइन्स वीक उत्साहाने साजरा होत आहे. रिलेशनशिप मध्ये असलेल्या कपल्स साठी ही संधी परस्परांवरील प्रेम दर्शविण्यासाठी असतेच, पण या निमित्ताने अनेक कपल्स आपल्या प्रेमजीवनाला सुरुवातही करत असतात. या प्रेमीजनांबरोबर अशी ही मंडळी असतात ज्यांचा प्रेमभंग होऊन, रिलेशनशिप काही कारणाने संपुष्टात आलेली असते. कोणाचे आपल्या जोडीदाराशी मतभेद झालेले असतात, तर कोणाचा जोडीदार त्याला सोडून दुसऱ्याच कोणाशी तरी संधान जुळवून मोकळा झालेला असतो. अशा जोडीदाराच्या बद्दल मनामध्ये थोडा फार राग ही असतोच. आपल्याला सोडून गेलेल्या पूर्वप्रेमिकाला स्मरण्याची आणि त्याच्या नावे एक अनोखी भेटवस्तू करण्याची संधी ब्रिटनमधील एक प्राणीसंग्रहालय, प्रेमभंग झालेल्या मंडळींना देत आहे.
valentine1
इंग्लंडमधील सेव्हनओक्स येथील हेम्सली कॉन्झर्व्हेशन सेंटरच्या वतीने या संदर्भात नुकतीच एक पोस्ट सोशल मिडीयावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पोस्टनुसार या प्राणीसंग्रहालयाला आर्थिक मदतीची आवश्यकता असून, हा निधी गोळा करण्यासाठी या प्राणी संग्रहालयाने एक अनोखी कल्पना सादर केली आहे. प्रेमभंग झालेल्या मंडळींना आपल्या पूर्वप्रेमींचे नाव, प्राणीसंग्रहालयातील झुरळांना देता येणार आहे. व्हॅलेंटाइन डेचे निमित्त साधून प्राणी संग्रहालयाच्या वतीने ही नवीन कल्पना अंमलात आणण्यात येणार आहे. एका झुरळाला आपल्या पूर्वप्रेमीचे नाव देण्यासाठी १.५० पौंड रक्कम मोजावी लागणार आहे. भारतीय चलनामध्ये ही किंमत सुमारे १४० रुपये आहे.
valentine2
हेम्सली कॉन्झर्व्हेशन सेन्टरने सोशल मिडीयावर प्रसिद्ध केलेल्या या पोस्टवर अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. या पोस्टमुळे लोकांचे भरपूर मनोरंजन होत असून, या अनोख्या कल्पनेचे लोकांनी भरपूर कौतुकही केले आहे. या प्राणी संग्रहालयामध्ये झुरळांची संख्या भरपूर असेल अशी आशा व्यक्त करून, यातील बऱ्याच झुरळांना आपल्या पूर्वप्रेमींचे नाव देण्याची आपली इच्छा असल्याचे कोणी म्हटले आहे, तर आपल्या पूर्वप्रेमींची नावे या झुरळांना देता देता आपल्याकडील पैसेच संपून जातील अशा प्रकारच्याही मजेशीर प्रतिक्रिया लोकांनी सोशल मिडीयावर व्यक्त केल्या आहेत.

Leave a Comment