आता जपानमधील ट्रेन्सवर दिसणार भारतातील सुप्रसिद्ध ‘मधुबनी’

Railways

जपान सरकारच्या वतीने भारतीय रेल्वे मंत्रालयाला एक अतिशय आगळी विनंती करण्यात आली आहे. जपान सरकारने आपल्या ट्रेन्सवर भारतातील बिहार राज्याची खासियत असलेली ‘मधुबनी’ चित्रकला करवून घेण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी या चित्रकलेमध्ये पारंगत असे काही चित्रकार या कामी जपानला पाठविण्यात येण्यासंबंधी ही विनंती आहे. भारताच्या रेल्वे मंत्रालयातर्फे या विनंतीला मान देत मधुबनीमध्ये पारंगत चित्रकारांचे एक दल लवकरच जपानला पाठविले जाण्याची शक्यता आहे.

Railways2

भारतातील लोककलांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने अलीकडच्या काळात बिहार येथून प्रवास सुरु करणाऱ्या राजधानी एक्स्र्पेस आणि संपर्क क्रांती एक्स्प्रेस या ट्रेन्स मधुबनी चित्रकारीने सजविल्या गेल्या होत्या. पटना राजधानीच्या बावीस कोचेसवर ही चित्रकला प्रथम प्रदर्शित केली गेली होती. ही चित्रकला केवळ ट्रेनच्या बाहेरील बाजूला केली गेली नसून, कोचेसचा अंतर्गत भागही या सुंदर चित्रकलेने नटलेला आहे. याचबरोबर सर्व राज्यांनी आपापल्या राज्यातील लोककलांना प्रोत्साहन द्यावे आणि त्यांचा प्रसार करावा या उद्देशाने ट्रेन्सवर आणि रेल्ेब स्थानकांवर या चित्रकलांच्या माध्यमातून सजावट केली जाण्यावर भर दिला जात आहे. काही काळापूर्वी बिहार येथील मधुबनी रेल्वे स्थानक, तिथे सर्वत्र केल्या गेलेल्या मधुबनी चित्रकलेमुळे भारत भरामध्ये सर्वांच्याच आकर्षणाचा नि कौतुकाचा विषय ठरले होते.

Railways3
भारत आणि जपान हे दोन्ही देश जगातील सर्वात मोठ्या लोकतंत्रांपैकी असून, या दोन्ही देशांमधील राजकीय संबंध उत्तम आहेत. तसेच या देशांमध्ये सांस्कृतिक देवाणघेवाणही सातत्याने सुरु असते. त्यामुळे या दोन्ही देशांमध्ये सामंजस्याची भावना असून, अनेक आर्थिक, राजकीय बाबतीतही हे देश एकमेकांचे सहकार्य करीत असतात. जपान व्यतिरिक्त कॅनडाही तेथील ट्रेन्सवर मधुबनी चित्रकला करवून घेण्याचा विचार करीत असल्याचे समजते.

Leave a Comment