गुरुग्राममध्ये वाहतुकीचे नियम पाळण्याबद्दल जनजागृती करणार ‘गब्बर’ आणि ‘सांभा’

gabbar-and-sambha

अनेकदा केवळ वाहतुकीचे नियम पाळल्याने होणाऱ्या अपघातांना नागरिकांना तोंड द्यावे लागते. वाहनाला होणाऱ्या नुकसानाबरोबरच गंभीर शारीरिक इजेला ही अनेकांना तोंड द्यावे लागते. वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून केलेल्या बेजबाबदार ड्रायव्हिंगमुळे अनेक नागरिकांना आपले प्राणही गमवावे लागल्याची वृत्ते आपल्या कानांवर अनेकदा पडत असतात. अशा प्रकरच्या बेजबाबदार ड्रायव्हिंगला आळा बसावा, त्यामुळे होणारे अपघात टाळता यावे, आणि नागरिकांना वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी प्रेरित केले जावे या उद्देशाने गुरूग्राम वाहतूक पोलिसांनी एक आगळा उपाय लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

वाहतुकीचे नियम पाळले जाण्याबाबत जनजागृती करण्याची जबाबदारी गुरूग्राम वाहतूक पोलिसांनी एके काळी सुपरहिट ठरलेल्या ‘शोले’ चित्रपटातील ‘गब्बर’ आणि ‘सांभा’ यांच्यावर सोपविली असून, हे दोघे ही आता वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत नागरिकांना प्रेरित करणार आहेत. दिल्लीतील एका खासगी एनजीओचे स्वयंसेवक गब्बर आणि सांभा बनून रस्त्यांवर उतरणार असून, पथनाटिकांच्या (स्ट्रीट प्ले) द्वारे लोकांना वाहतुकीचे नियम पाळण्याचे महत्व समजावून सांगणार आहेत. ही पथनाट्ये गुरूग्राम शहरातील मुख्य रहदारीच्या रस्त्यांवर आयोजित केली जाणार आहेत.

या उपक्रमामध्ये वाहतूक पोलीस आणि रोड सेफ्टी ऑर्गनायझेशनचे कर्मचारी देखील सहभागी होणार असून, अपघात टाळण्याच्या दृष्टीने वाहतुकीचे नियम पाळले जाण्याचे महत्व जनतेला पटवून दिले जाणार आहे. या उपक्रमामध्ये सादर केल्या जाणऱ्या पथनाट्यातील संवादही ‘शोले’ चित्रपटामधील संवादांच्या धाटणीचे असून, ही पथनाट्ये नागरिकांना पसंत पडतील आणि त्यांपासून प्रेरणा घेत वाहतुकीचे नियम पाळण्यास नागरिक प्रेरित होतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment