VIDEO: धोनीने केलेले काम पाहून प्रत्येक भारतीयाला अभिमानच वाटेल

dhoni
हॅमिल्टन (न्यूझीलंड): भारताला न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक टी-20 वन डे सामन्यात 4 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. भारताने या पराभवामुळे टी-20 मालिका 1-2 ने गमावली. भारतीय क्रिकेटप्रेमींना या पराभवाचे शल्य असले, तरी क्रिकेटप्रेमींचा उर टीम इंडियाचा आधारस्तंभ महेंद्रसिंह धोनीचं देशप्रेम पाहून देशप्रेमाने भरुन आला. 213 धावांचे लक्ष्य भारताला या सामन्यात देण्यात आले होते, मात्र भारताला 20 षटकात 208 धावाच करता आल्या.

सध्या सोशल मीडियावर या सामन्या दरम्यानचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. धोनीचे या व्हिडीओतील देशप्रेम पाहून तुम्ही आम्ही सगळेच त्याला सलाम ठोकल्याशिवाय राहणार नाही. केवळ क्रिकेटदरम्यानच धोनीचे प्रसंगावधान, चाणाक्ष बुद्धीमत्ता पाहायला मिळते असे नाही, तर वेळोवेळी त्याची प्रचिती येत असते. धोनीने कालच्या सामन्यादरम्यान भारताच्या तिरंग्याची शान राखली.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या टी 20 सामन्यादरम्यान, धोनीचा एक फॅन तिरंगा घेऊन मैदानात घुसला. सुरक्षाकवच तोडून तो धोनीच्या दिशेने धावत आला. त्यावेळी धोनी विकेटकीपिंग करत होता. तो फॅन आला आणि तिरंग्यासह धोनीच्या पाया पडू लागला. त्याचवेळी भारताचा तिरंगा खाली जमिनीवर टेकणार होता, तेवढ्यात धोनीने आधी तिरंगा हातात घेतला. त्यानंतर मग आलेल्या फॅनला उठवले.


उपस्थितांनी धोनीचे हे देशप्रेम पाहून एकच जल्लोष करुन धोनीबद्दल आदर व्यक्त केला. धोनीच्या प्रसंगावधानाचे या सामन्याची कॉमेंट्री करणाऱ्यांनीही कौतुक केले. धोनी ज्या वेगाने स्टम्पिंग करुन एखाद्या फलंदाजाला बाद करतो, त्याच वेगाने धोनीने तिरंगा उचलला. धोनीचा हाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर लाईक्स मिळवत आहे.