आमिर खान आणि किरण राव यांनी गोव्यात खरेदी केले नवे बीच हाऊस

aamirkhan-kiran
चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये सातत्याने व्यस्त असलेल्या परफेक्शनिस्ट आमिर खानला विश्रांतीची गरज भासली, की मुंबईच्या गोंगाटापासून दूर पाचगणी येथे असलेल्या आलिशान व्हिलामध्ये आमिर आपला मुक्काम हलवीत असतो. पाचगणी येथील आलिशान व्हीलाखेरीज लोणावळा येथे ही आमिरच्या मालकीचा एक आलिशान बंगला आहे. मुंबई खेरीज इतर ठिकाणी असलेल्या आमिरच्या मालकीच्या या घरांच्या यादीमध्ये आता आणखी एका घराची भर पडत असल्याचे वृत्त आहे. या वृत्तानुसार आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनी आता गोव्यामध्ये एक बीच हाऊस खरेदी केले असल्याचे समजते.

या बीच हाऊसच्या खरेदीच्या निमित्ताने आमिरची पत्नी किरण राव हिला वारंवार गोव्यामध्ये पाहिले गेले होते. आमिरने येथे एक बीच हाऊस खरेदी केले असून त्याच्या सजावटीची जबाबदारी किरणने स्वीकारली असल्याने तिचे गोव्यामध्ये वरचेवर येणे होत असल्याचे समजते. नववर्षाच्या निमित्ताने आमिर आणि किरणने नव्या घराची खरेदी केली असल्याचे म्हटले जात आहे.

व्यावसायिक पातळीवर बोलायचे झाले तर सव्वीस जानेवारी रोजी आमिर खानच्या टेलिव्हिजनवर सादर केल्या गेलेल्या ‘रूबरू रोशनी’ या कार्यक्रमाला दर्शकांचा चांगला प्रतिसाद लाभला. तर दुसरीकडे आमिरच्या ‘ठ्ग्ज ऑफ हिंदोस्तान’ला भारतासोबत इतर देशांमध्ये ही अपयशच मिळाले. तर किरण रावने सध्या केवळ चित्रपटांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतल्याने ‘मामि’च्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. तिच्या जागी अभिनेत्री दीपिका पदुकोन हिची ‘मामि’ची नवी अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.