सोनाक्षीच्या ‘मुंगडा’ गीतावर गानसम्राज्ञी लता मंगेशकर, राजेश रोशन यांची नाराजी

songs

लवकरच प्रदर्शित होत असलेल्या ‘टोटल धमाल’ चित्रपटामधील ‘मुंगडा’ या गाण्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या गाण्यामध्ये असलेल्या ‘मुंगडा’ या गाण्यामुळे चित्रपटाचे निर्माते आणि सोनाक्षी सिन्हाला देखील टीकेचा सामना करावा लागत आहे. ‘मुंगडा’ हे गीत मूळचे १९७८ साली प्रदर्शित झालेल्या ‘इन्कार’ या चित्रपटातील असून, हे गीत उषा मंगेशकर यांनी गायिले होते. या गीताला राजेश रोशन यांचे संगीत असून, या गीत मजरूह सुलतानपुरी यांनी लिहिले होते. हे गाणे त्या चित्रपटामध्ये अभिनेत्री हेलन यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. ‘टोटल धमाल’ या मल्टी स्टारकास्ट असलेल्या चित्रपटामध्ये हे गीत ‘री-क्रिएट’ करण्यात आले असून, हे गीत अभिनेत्री सोनाक्षी सिन्हावर चित्रित करण्यात आले आहे. ‘टोटल धमाल’ या चित्रपटासाठी हे गीत ज्योतिका तांग्री, शान आणि शुभ्रो गांगुली यांनी गायिले असून, या गीताला गौरव-रोशीन यांनी संगीत दिले आहे.

मात्र ‘मुंगडा’ आता ज्या पद्धतीने बनविले गेले आहे, त्याबद्दल मूळच्या ‘मुंगडा’ गीताशी संबंधित सर्वच कलाकारांनी नाराजी व्यक्त केली असून, या गाण्याचा रीमेक करण्यापूर्वी आपल्याशी कोणतीही चर्चा करण्यात आली नसून, याबद्दल कोणालाही आपले मत विचारावेसे वाटले नसल्याची खंत या दिग्गज कलाकारांनी व्यक्त केली आहे. ‘त्या काळी लिहिली जाणारी, व स्वरबद्ध केली जाणारी गीते अतिशय विचारपूर्वक लिहिली आणि स्वरबद्ध केली जात असत. पण आता जुन्या गीतांचा असंवेदनशील पणे ‘रीमेक’ करून या गीतांमधील आनंद, मजा कुठे तरी हरवून जात असते’, अशी प्रतिक्रिया उषा मंगेशकर यांनी व्यक्त केली आहे.

त्याचबरोबर या गीताचा रीमेक करण्याआधी आपले मत जाणून घेण्याचा प्रयत्न कोणीही केला नसल्याची खंत गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी व्यक्त केली आहे. तसेच मूळ गाणे इतर कलाकाराने गायिले असताना त्या गाण्याचा रीमेक करण्याआधी त्या कलाकाराची परवानगी घेणेही कोणाला उचित वाटत नसल्याची नाराजी लता दीदींनी व्यक्त केली आहे. ‘इन्कार’ चित्रपटातील ‘मुंगडा’ या गीताचे संगीतकार राजेश रोशन यांनी ही याबद्दल आपली नाराजी दर्शविली आहे. आजकालच्या तथाकथित संगीतकारांकडे स्वतःचे संगीत निर्माण करण्याचा आत्मविश्वास नसल्याने जुन्या गाण्यांचाच रीमेक करून वापर करण्याची वेळ आली असल्याचे राजेश रोशन म्हणतात. ‘मुंगडा’ या गाण्याच्या रीमेकवर केवळ या दिग्गज कलाकारांनीच नाही, तर अनेक संगीत प्रेमींनीही टीकेची झोड उठविली आहे.

Loading RSS Feed

Leave a Comment