इसिसचा संपूर्ण खात्मा दोन आठवड्यांत होईल – ट्रम्प

trump
आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना इस्लामिक राज्य (इसिस) हिचा संपूर्ण खात्मा येत्या दोन आठवड्यांत होईल. इराक आणि सीरियामध्ये इसिसचा 100 टक्के पराभव होईल, असे भाकीत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. आपल्या सरकारने या संघटनेच्या दुष्ट विचारसरणीशी सामना करण्यासाठी नवा दृष्टिकोन स्वीकारला असल्याचे ते म्हणाले.

इसिसकडे सध्या इराक आणि सीरियामध्ये केवळ 1 टक्के जमीन आहे, असे इसिसच्या विरोधात लढणाऱ्या जागतिक आघाडीने गेल्या वर्षी जाहीर केले होते. मात्र अफगाणिस्तान, लिबिया, सिनाई आणि पश्चिम आफ्रिकेत इसिसकडे अध्याप काही क्षेत्र आहे.

इसिसला पराभूत कऱण्यासाठी स्थापन झालेल्या जागतिक आघाडीच्या मंत्री परिषदेसमोर बुधवारी ट्रम्प यांचे भाषण झाले. त्यावेळी ते म्हणाले, की इसिस नष्ट झाली आहे. “आपण खिलाफतीचा (इसिस) 100 टक्के पराभव केला आहे, ही औपचारिक घोषणा पुढील आठवड्यांत करता येईल. मात्र अधिकृत माहितीची वाट पाहणे मी पसंत करेन,” असे ट्रम्प म्हणाले.

“गेल्या दोन वर्षांत अमेरिकेने आणि त्याच्या भागीदारांनी 20,000 चौरस मैलांपेक्षा जास्त जमीन ताब्यात घेतली आहे,” असे ते म्हणाले. अमेरिकेने आणि तिच्या भागीदारांनी या रक्तपिपासू खुन्यांच्या तावडीतून 50 लाखांहून अधिक नागरिकांना मुक्त केले आहे, असा दावा त्यांनी केला. सुमारे 80 देशांतील वरिष्ठ राजनैतिक अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

Leave a Comment