प्रिन्स चार्ल्स आणि कॅमिलाचे अनौरस अपत्य असल्याचा ऑस्ट्रेलियन इसमाचा दावा

prince
सायमन दोरान्ते-डे नामक एका ऑस्ट्रेलियन इसमाने, आपण ब्रिटीश राजघराण्याचे युवराज प्रिन्स चार्ल्स आणि कॅमिला यांचे अनौरस अपत्य असल्याचा धक्कादायक दावा केला असून, चार्ल्स यांची दिवंगत पूर्व पत्नी लेडी डायना यांना ही गोष्ट ठाऊक होती व हे सत्य त्या सर्वांसमोर खुले करण्याच्या विचारात असल्याचेही सायमन यांचे म्हणणे आहे. पण तत्पूर्वीच डायनाचा एका भीषण कार अपघातामध्ये मृत्यू झाल्याने अनेक वर्षे हे सत्य जगापासून लपून राहिल्याचे सायमन म्हणतात. सायमन आता ५२ वर्षांचे असून, त्यांचा जन्म १९६६ साली, पोर्ट्समथ जवळील एका गावामध्ये झाला होता. सायमन अठरा वर्षांचे झाल्यानंतर कॅरन आणि डेव्हिड डे या दाम्पत्याने त्यांना दत्तक घेतले होते.

प्रिन्स चार्ल्स आणि डायना यांच्या विवाहाच्या पूर्वी प्रिन्स चार्ल्स यांचे कॅमिलाशी प्रेमसंबंध होते. पण कॅमिला तेव्हा विवाहित असल्याने आणि घटस्फोटीतेशी विवाह करणे राजघराण्याच्या परंपरेला धरून नसल्याने प्रिन्स चार्ल्स यांना कॅमिलाशी विवाह करता येणे शक्य नव्हते. याच प्रेमसंबंधातून, चार्ल्स आणि डायनाच्या विवाहापूर्वीच आपला जन्म झाला असल्याचे सायमनचे म्हणणे होते. सायमनच्या आजीने त्यांना याबद्दल सांगितल्याचे सायमन म्हणतात.

सध्या क्वीन्सलँड येथे वास्तव्यास असणाऱ्या सायमनची पत्नी एल्व्हीयाना यांना देखील सायमन सत्य सांगत असल्याची खात्री आहे. आपण चार्ल्स आणि कॅमिलाचे अपत्य असल्याचे धक्कादायक वक्तव्य सायमन यांनी तीन वर्षांपूर्वी केले असून, अलीकडच्या काळामध्ये त्यांनी एका साप्ताहिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये या गोष्टीबद्दल पुन्हा वक्तव्य केले आहे. तसेच चार्ल्स यांची पूर्वपत्नी लेडी डायना यांना सायमन यांच्या अस्तित्वाबद्दल पूर्ण कल्पना असून हे सत्य डायना उघड करण्याच्या बेतात होती असे सायमनचे म्हणणे आहे. बावीस वर्षांपूर्वी डायनाचा अपघाती मृत्यू झाला नसता, तर हे सत्य तेव्हाच उघडकीला आले असते असे सायमन यांना वाटते. दरम्यान शाही परिवाराच्या वतीने सायमन करीत असलेल्या दाव्यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

Leave a Comment