एस्टोनिया – जगातील सर्वप्रथम ‘डिजिटल नेशन’

Estonia
एस्टोनिया देशाचा लौकिक, सर्व जगामध्ये सर्वाधिक ‘डिजिटल’ प्रगती झालेला देश म्हणून आहे. सोव्हियत संघातून हा देश अठ्ठावीस वर्षांपूर्वी वेगळा झाला. तेव्हापासून या लहानशा बाल्टिक देशाने जगातील सर्वप्रथम ‘ई-नेशन’ बनण्यासाठी वाटचाल सुरु केली होती. या देशातील नागरिकांना पुरविल्या जाणाऱ्या सुमारे नव्वद टक्के प्रशासनिक सेवा आता संपूर्णपणे डिजिटल झाल्या असून, इंटरनेटची सुविधा उपलब्ध असणे हा या देशातील नागरिकांचा मूलभूत हक्क मानला गेला आहे. इतकेच नाही, तर या मूलभूत हक्काचा उल्लेख एस्टोनियाच्या घटनेमध्ये ही आहे. अलीकडेच केलेल्या एका ट्वीटमध्ये एस्टोनियाच्या राष्ट्राध्यक्षांनी देशातील ‘हाय प्रपोर्शन युनिकॉर्न्स’, म्हणजेच एक बिलियन डॉलर्सच्याही पेक्षा अधिक मूल्य असलेल्या कंपन्यांचा उल्लेख केला आहे. या देशाच्या जनसंख्येच्या मानाने या देशामध्ये एक बिलीयन डॉलर्सपेक्षा अधिक मूल्य असलेल्या कंपन्यांचे प्रमाण जास्त असल्याचे राष्ट्राध्यक्षांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. एस्टोनियातील अनेक ‘युनिकॉर्न्स’ पैकी ‘स्काईप’ आपल्या सर्वांच्याच परिचयाचे असून ‘प्ले टेक’, ‘टॅक्सिफाय’ आणि ‘ट्रान्स्फरवाईज’ या इतर मोठ्या कंपन्या येथे आहेत.

(व्हिडीओ सौजन्य france 24 english)

लंडन,पॅरीस,बर्लिन आणि सिलिकॉन व्हॅलीच्या पाठोपाठ आता एस्टोनियामधील ‘टॅलीन’ हे उद्योजकांच्या दृष्टीने महात्वाचे शहर ठरत आहे. अनेक उद्योजकांनी आपले स्टार्ट अप्स सुरु करण्यासाठी टॅलीनची निवड केली आहे. या ठिकाणी अनेक लहानमोठ्या कंपन्यांंनी आर्थिक निवेश करण्यास सुरुवात केली असून, त्यासाठी लागणारे प्रशिक्षित मनुष्यबळ येथे मुबलक आणि स्वस्तात उपलब्ध आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचे केन्द्रस्थळ बनलेल्या टॅलीन शहराला युरोपची ‘सिलिकॉन व्हॅली’ म्हटले जाऊ लागले आहे. चिली,चीन, इटली इत्यादी देशातील स्टार्ट अप्स प्रामुख्याने या ठिकाणी पहावयास मिळत आहेत.टॅलीन येथे असलेली ही अनेक स्टार्ट अप्सची ‘टेक कम्युनिटी’अतिशय कार्यक्षम समजली जाते. म्हणूनच आतापर्यंत ३४० कंपन्यांना ‘स्टार्ट अप स्टेटस’ देण्यात आले असून,यांना ‘स्टार्ट अप व्हिसा’ व तात्पुरत्या निवासी व्हिसाची परवानगी देण्यात आली आहे.

एस्टोनियाने उपलब्ध करून दिलेल्या ‘ई रेसिडन्सी’ च्या सुविधेमुळे एस्टोनिया देशामध्ये प्रत्यक्ष प्रवेश न करता ही ‘डिजिटल सिटीझन’ होऊन आपली कंपनी येथे सुरु करण्याची मुभा उद्योजकांना देण्यात आली आहे. ‘स्टार्ट अप एस्टोनिया’ नामक योजना एस्टोनिया सरकारच्या वतीने सुरु करण्यात आली असून, देश-विदेशातील स्टार्ट अप्सनी येथे येऊन उद्योग प्रस्थापित करण्याला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरु केली गेली आहे.

सरकारच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या ‘ई एस्टोनिया प्रोजेक्ट’च्या माध्यमातून सरकार अधिक कार्यक्षम आणि सरकारी व्यवहार कमी कटकटीचे आणि भ्रष्टाचारमुक्त असावेत या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. या देशाच्या प्रत्येक नागरिकाला संपूर्णपणे सुरक्षित अशी ‘डिजिटल आयडेंटिटी’ देण्यात आली असून, याचा उपयोग कर भरणे, नागरिकांची मेडिकल रेकॉर्ड्स मेंटेन करणे आणि मतदान करण्यासाठी केला जात आहे. केवळ विवाह, घटस्फोट, आणि घराची किंवा प्रॉपर्टीची खरेदी-विक्री याखेरीज सर्व कामे एस्टोनियामध्ये आता डिजिटल झालेली आहेत.

Leave a Comment