प्रत्यार्पणाच्या आदेशविरोधात अपिल करणार विजय माल्ल्या

vijay-mallya
नवी दिल्ली – भारतीय बँकांना हजारो कोटींचा चुना लावून परदेशात फरार झालेल्या विजय माल्ल्याच्या प्रत्यार्पणास ब्रिटनचे गृहमंत्री साजिद जावीद यांनी मंजुरी दिली आहे. दरम्यान, ब्रिटन सरकारच्या आदेशाविरोधात अपील करणार असल्याचे विजय माल्ल्याने ट्विट करत सांगितले आहे.

माल्ल्याच्या प्रत्यार्पणास ब्रिटनचे गृहमंत्री साजिद जावीद यांच्याकडून मंजुरी मिळाल्यानंतर विजय माल्ल्याने ट्विट केले आहे. १० डिसेंबर २०१८ रोजी वेस्ट मिनिस्टर मॅजिस्ट्रेट न्यायालयाकडून दिलेल्या निर्णयाविरोधात मी अपील करण्याचे ठरवले होते. गृह सचिवांच्या निर्णयापूर्वी मला अपिलाची प्रक्रिया सुरू करता आली नाही. मी आता अपिलाची प्रक्रिया सुरू करेन, असे विजय माल्ल्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

ब्रिटनच्या गृह मंत्रालयाने सोमवारी फसवणुकीचा कट रचणे आणि मनी लाँडरिंगचा आरोप असलेल्या विजय माल्ल्याच्या प्रत्यार्पणाचे आदेश दिल्याचे सांगितले. १० डिसेंबर २०१८ ला लंडनच्या वेस्टमिनिस्टर मॅजिस्ट्रेटच्या न्यायालयाने ६३ वर्षीय माल्ल्याला भारतीय न्यायालयांना उत्तर द्यावे लागेल, असे म्हटले होते.

आता ब्रिटनच्या उच्च न्यायालयात अपील करण्याच्या परवानगीसाठी अर्ज दाखल करण्याची माल्ल्याला ४ फेब्रुवारीपासून १४ दिवसांची मुदत असेल. जर अपिलास मंजुरी देण्यात आली तर माल्ल्याच्या खटल्यावर उच्च न्यायालयात सुनावणी होईल. बँकांना हजारो कोटींचा चुना लावल्याचा आरोप असलेल्या माल्ल्याला फरार घोषित करण्यात आले आहे. त्याला भारतात आणण्यासाठी अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू होते.

Leave a Comment