चित्रपटाच्या प्रमोशन करिता काय काय करतात अभिनेते !

act
एखादा चित्रपट हा आपल्या दृष्टीने दोन ते अडीच तासांचा मनोरंजनाचा कार्यक्रम असला, तरी या चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, यामध्ये भूमिका करणारे कलाकार, यांपासून ते अगदी स्पॉट बॉईज पर्यंत सर्वांसाठी हा चित्रपट म्हणजे एखादी मोहीमच असते. आणि ही मोहीम सर्वार्थाने यशस्वी करून दाखविण्याची जबाबदारी सर्वांचीच असते. चित्रपट एकदा तयार झाला, की तो प्रदर्शित होईपर्यंत या चित्रपटाचे शक्य तितक्या वेगवेगळ्या पद्धतीने प्रमोशन केले जाते, जेणेकरून प्रेक्षकांचे लक्ष याकडे आकर्षित व्हावे, आणि हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी सिनेमागृहामध्ये येऊन चित्रपटाला चांगला प्रतिसाद द्यावा यासाठी ही कसरत केली जात असते.
act1
आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यामध्ये कलाकारही मागे नसतात. केवळ डोळ्यांची उघडझाप करून रातोरात मिडिया सेन्सेशन बनलेली प्रिया प्रकाश वॅरियर आपल्या सर्वांच्या चांगल्याच आठवणीत आहे. प्रियाचा हा काही सेकंदांचा व्हिडियो इंटरनेटवर खूपच लोकप्रिय ठरला होता. या व्हिडियोच्या रूपाने प्रिया आपल्या ‘ओरु आदार लव्ह’ या चित्रपटाचे प्रमोशन करीत होती. हा प्रमोशन व्हिडियो प्रदर्शित होताना हा इतका यशस्वी ठरेल याचा अंदाज व्हिडियो निर्माते आणि दिग्दर्शकांनाच काय, तर खुद्द प्रियालाही नव्हता.
act2
अभिनेता आमिर खानला चित्रसृष्टीमध्ये ‘परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखले जाते. चित्रपटामध्ये अभिनय करताना आपल्या भूमिकेला संपूर्ण न्याय देण्याच्या बाबतीत अतिशय काटेकोर असलेला आमिर, चित्रपटाच्या प्रमोशनच्या बाबतीतही तितकाच काटेकोर आहे. सुपरहिट ठरलेल्या आमिरच्या ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी आमिरने स्वतः या चित्रपटाची पोस्टर्स सगळीकडे लाववली असून, त्यावर ‘हू इज आमिर खान? आस्क द गर्ल नेक्स्ट डोअर’ असे कॅप्शन लिहिले होते. या कॅप्शनमुळे आमिर खानच्या या चित्रपटाबद्दल चांगलीच उत्कंठा तरुणवर्गामध्ये निर्माण झाली, आणि चित्रपट अर्थातच सुपरहिट ठरला.
act3
अतिशय ‘एनर्जेटिक’ समजला जाणाऱ्या अभिनेता रणवीर सिंहने त्याच्या ‘सिम्बा’ चित्रपटासाठी प्रमोशन करण्यात कोणतीही कसर ठेवली नव्हती. इतकेच नाही, तर चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा काय प्रतिसाद मिळत आहे हे पाहण्यासाठी रणवीरने स्वतः चित्रपटगृहामध्ये हजेरी लावली. यावेळी रणवीरसोबत ‘सिम्बा’ चा दिग्दर्शक रोहित शेट्टी देखील होता. नायिकाप्रधान चित्रपट यशस्वीपणे पेलणारी अभिनेत्री म्हणून विद्या बालनचा लौकिक आहे. तिचा ‘कहानी’ हा चित्रपट प्रेक्षकांना खूपच आवडला. यामध्ये एका गर्भवती महिलेची भूमिका विद्याने केली आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी देखील विद्याने तिच्या पोटाच्या भोवती पॅडिंग लावले असल्याने विद्या गर्भवती आहे की काय असे सर्वांना वाटले, पण प्रमोशनच्या दरम्यान विद्या करीत असलेल्या भूमिकेप्रमाणेच पोशाख विद्याने प्रमोशन साठीही परिधान केल्याचे समजल्याने तिच्या या भूमिकेबद्दल लोकांना खूपच कुतूहल होते.

Leave a Comment