ममता दीदींची विश्वासू माजी आयपीएस अधिकारी भाजपमध्ये

ips
पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय अन्वेषण संस्था (सीबीआय) आणि राज्य पोलिसांमध्ये संघर्ष उफाळलेला असतानाच एका महिला आयपीएस अधिकाऱ्याने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. तसेच राज्यात लोकशाहीऐवजी ‘ठगशाही’ असल्याचा आरोप या अधिकाऱ्याने केला आहे.

माजी आयपीएस अधिकारी भारती घोष यांनी सोमवारी भाजप प्रवेशाची घोषणा केली. त्यांच्यावर सध्या फौजदारी आरोप आहेत. भारती घोष या एकेकाळी ममता बॅनर्जी यांच्या विश्वासू समजल्या जात होत्या

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, खा. कैलाश विजयवर्गीय आणि खा. मुकुल रॉय या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत घोष यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ‘‘पश्चिम बंगालमध्ये लोकशाही नावालाही उपरलेली नाही. तिच्या जागी ‘गुन्हेशाही’ आणि ‘ठगशाही’ आली आहे,’’ असे त्या पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या. घोष यांच्या येण्याने भाजप मजबूत होईल, असे विजयवर्गीय म्हणाले.

घोष यांना 15 ऑगस्ट 2014 रोजी सेवा पदक प्रदान करण्यात आले होते. त्यांची 26 डिसेंबर 2018 रोजी पश्चिम बंगाल सशस्त्र पोलिसांच्या तिसऱ्या बटालियनच्या कमांडंट म्हणून बदली करण्यात आली होती. त्यानंतर दोन दिवसांनी त्यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर मिदनापूर जिल्ह्यातील दासपूर पोलीस ठाण्यात खंडणीच्या गुन्ह्यात त्यांच्यावर अटक वॉरंट काढण्यात आले होते. त्यांचे पती एम.ए.व्ही राजू यांच्यावरही आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. सोन्याच्या बदल्यात बंदी घातलेल्या नोटांचा व्यवहार करण्याचा त्यांच्यावर आरोप होता.

Leave a Comment