‘दिवंगत’ साधू महाराज पुनश्च अवतरले ! उत्तराखंडातील धक्कादायक घटना

man
उत्तराखंड राज्यातील पिपलिया गावामध्ये भरवस्तीपासून काहीशा दूरवर असलेल्या झोपडीमध्ये काही दिवसांपूर्वी अचानक लाग लागली, आणि या झोपडीमध्ये राहणाऱ्या उमाशंकर नामक एका साधूचा या आगीमध्ये जळून मृत्यू झाला. मात्र ही घटना घडून गेल्याच्या दोन दिवसांच्या नंतर हे साधू महाराज पोलीस स्टेशनमध्ये अवतरल्याने पोलीसही बुचकळ्यात पडले. आपल्या मृत्यूची बातमी वृत्तपत्रामध्ये वाचून गोंधळून गेलेल्या या साधू महाराजांनी त्वरित पिपलिया पोलीस चौकी गाठली, आणि आपण काही दिवसांपूर्वी त्या झोपडीमध्ये नसून, गेले दोन तीन महिने आपण त्या गावातच राहत नसल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.

उमाशंकर जर जिवंत असले, तर मग झोपडीमध्ये जळून मरण पावलेला इसम कोण होता या प्रश्नाने आता पोलिसांना आणि समस्त गावकऱ्यांना हैराण करून सोडले आहे. पिपलिया गावामध्ये असलेल्या एका कॉलनीपासून काही अंतरावर एक मंदिर असून, या मंदिराच्या जवळ उमाशंकर यांची झोपडी होती. काही दिवसांपूर्वी या झोपडीमध्ये अचानक आग लागल्याचे समजताच पोलीस तेथे पोहोचल्यानंतर या झोपडीमध्ये जळलेल्या अवस्थेतील एक शव पोलिसांना सापडले होते. या घटनेची चौकशी पोलिसांनी सुरु केली असता, ही झोपडी साठ वर्षीय उमाशंकर नामक साधूची असल्याचे पोलिसांना समजले.

त्यानंतर झोपडीमध्ये मिळालेले शव उमाशंकरचे आहे असे समजून पोलिसांनी उमाशंकरच्या नावे शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करवून, उमाशंकर समजून या शवाचे अंतिमविधीही उरकून टाकले. या अंत्यविधीसाठी समस्त ग्रामस्थ मंडळी उपस्थित होती. ही सर्व घटना वृत्तपत्रामध्ये वाचल्यानंतर उमाशंकर स्वतः पोलिसांसमोर हजर झालले आणि त्यानंतर सर्व प्रकार उघडकीला आला. उमाशंकर गेले दोनतीन महिन्यांपासून या गावामध्ये रहात नसून, आपले आधार कार्ड बनविण्याकरिता उत्तर प्रदेशातील बलिया गावी गेले होते आणि तिथूनच पुढे कुंभ मेळ्यासाठी जाण्याचा त्यांचा विचार असल्याने आपण उधम सिंह नगरमध्ये भिक्षा मागून प्रवासासाठी पैशांची सोय करीत असल्याचे उमाशंकर म्हणाले.

मात्र आता उमाशंकर जिवंत असल्याचे सत्य उघडकीला आल्यानंतर त्यांच्या झोपडीमध्ये सापडलेले शव कोणाचे होते हे शोधून काढण्याची अशक्यप्राय कामगिरी पोलिसांसमोर उभी आहे. या शवाचे आता अंत्यविधी देखील उरकून टाकले गेले असल्याने कोणतेही पुरावे मिळविणे पोलिसांना कठीण जाणार आहे.

Leave a Comment