ममता बॅनर्जींच्या ‘संविधान बचाव’ धरणे आंदोलनाला शरद पवार, राज ठाकरेंचा पाठिंबा

mamta-banerjee
मुंबई – कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या घरी सीबीआयचे अधिकारी शारदा चीटफंड घोटाळाप्रकरणी चौकशीसाठी गेले होते. त्यानंतर पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. या संपूर्ण घटनाक्रमानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सीबीआयच्या या कारवाईविरोधात मेट्रो चॅनेलबाहेर ‘संविधान बचाव’ धरणे आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही ममतांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ममतांना पाठिंबा दर्शविणारे ट्विट केले असून त्यात पश्चिम बंगालमध्ये उद्भवलेली परिस्थिती म्हणजे लोकशाहीवर हल्ला आहे. पश्चिम बंगालमध्ये सीबीआयचा गैरवापर विरोधकांना धमकावण्यासाठी केला असल्याचे असे म्हटले आहे.

ममता बॅनर्जी यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पाठिंबा दिला असून मा. ममता बॅनर्जी ह्यांनी केंद्राच्या एकाधिकारशाही विरोधात जो आवाज उठवला आहे, त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या ह्या लढ्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहिर पाठिंबा असल्याचे मी जाहीर करतो, असे राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.


दूसरीकडे सीबीआयने ही कारवाई न्यायालयाच्या आदेशानुसारच केल्याचे म्हटले असले तरी हा छापा कोणतीही पूर्वपरवानगी न घेता टाकण्यात आल्याचा आरोप पश्चिम बंगाल पोलिसांनी केला आहे. शारदा चीटफंड घोटाळ्याप्रकरणी राजीव कुमार यांनी केलेल्या तपासाची चौकशी करण्यासाठी सीबीआय पथक त्यांच्या घरी गेले होते. मात्र, कुमार यांच्या घराबाहेरील पोलीसांनी सीबीआय पथकाला अडवून ठेवल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता.

Leave a Comment