शिकागो थंडीने गारठले, आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी तापमानाची झाली नोंद

chicago
अमेरिकेतील शिकागो मध्ये सध्या थंडीने कहर केला असून, आजवरील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद येथे झाली आहे. शिकागोमध्ये थंडी इतकी भयंकर वाढली आहे, की रेल्वेचे रूळ थंडीमध्ये त्यावर बर्फ पडून गोठू नयेत या करिता रुळांच्या भोवती विस्तव पेटविला जात आहे. त्याचप्रमाणे नागरिकांना शक्यतो इमारतींच्या आतमधेच राहण्याचा सल्ला, आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात येत असून, कोणत्याही कामासाठी घराबाहेर पडावे लागलेच, तर कारणाविना रस्त्यावर न थांबण्याबद्दलची सूचनाही नागरिकांना देण्यात आली आहे. तसेच नागरिकांना कमी बोलणे आणि अतिशय खोल श्वास न घेण्याबद्दलही सूचना देण्यात आल्या आहेत.
chicago1
या ठिकाणी बाजारामध्ये बियर, फळांचे रस इत्यादी बाटल्यांमध्ये गोठून गेल्याने या पदार्थांची आवक घटली आहे. शिकागोमध्ये पारा इतका घसरण्याचे कारण ‘पोलर व्होर्टेक्स’ समजले जात आहे. पृथ्वीच्या ध्रुवांवर तयार होत असणाऱ्या अतिकमी दाबाच्या पट्ट्यांना पोलर व्होर्टेक्स म्हटले जाते. यामुळे सध्या शिकागोतील तापमान-३० अंशाच्या खाली घसरले असून, काही ठिकाणी अंटार्क्टिकामध्ये असते त्याही पेक्षा अधिक थंडी आहे. इतकी जास्त थंडी आणि त्या उलट भयंकर उन्हाळा हे दोन्ही प्रकार घातकच म्हणायला हवे.
chicago2
एकीकडे शिकागो गारठले असताना दुसरीकडे ऑस्ट्रेलियामध्ये मात्र यावेळी उन्हाळ्याचा तडाखा दरवर्षी वाढतानाच पहावयास मिळत आहे. गतवर्षी उन्हाळ्याने इतका कहर केला, की पक्षी आणि वटवाघुळे अति उष्मा सहन न झाल्याने झाडांवरूनच मरून जमिनीवर पडताना दिसत होती, तर अनेक नद्यांमधील जलचर मरण पावले असून, पाण्यावर तरंगताना पहावयास मिळाले. ऑस्ट्रेलियामध्ये मागील वर्षी उन्हाळ्यामध्ये पारा ४७ अंशांच्याही पुढे पोहोचला होता.
chicago3
तापमानामध्ये आढळणारे टोकाचे फरक अलीकडच्या काळामध्ये केवळ काही देशांपुरातेच मर्यादित राहिले नसून, जगातील सर्वच देशांमध्ये कमी अधिक प्रमाणात पहावयास मिळत आहेत. प्रदूषणाची वाढती पातळी याला कारणीभूत असून, ही समस्या सध्याच्या काळामधील सर्वात गंभीर समस्या म्हणावी लागेल.

Leave a Comment