मध्य प्रदेश सरकार उघडणार 1000 गोशाळा

goshala
गाय आणि गोरक्षण हे भारतीय जनता पक्षाचे प्रमुख अस्त्र मानले जात असले तरी काँग्रेसने याबाबतीत भाजपवर कुरघोडी केली आहे. मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकारने पुढील चार महिन्यांत राज्यभरात 1000 गोशाळा उभारण्याची घोषणा केली असून राज्यातील भटक्या गाई व त्यांच्या वासरांना या गोशाळेत ठेवण्यात येणार आहे. यातून एका मुद्द्यावर काँग्रेसने भाजपवर कुरघोडी केली असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

प्रत्येक गावात आणि पंचायत क्षेत्रात गोशाळा उभारणे हे 2018 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या जाहीरनाम्यात दिलेल्या प्रमुख आश्वासनांपैकी एक होते. “जे लोक स्वतःला गोरक्षक म्हणवतात त्यांनी 15 वर्षांमध्ये एकाही गोशाळेची निर्मिती केली नाही,” असा टोला कमलनाथ यांनी बुधवारी मारला.
या घोषणेद्वारे राज्यातील भटक्या जनावरांचा बंदोबस्त करण्याबरोबरच 40 लाख मनुष्य-दिवसांच्या रोजगाराचीही निर्मिती करण्याची सरकारची अपेक्षा आहे. यासाठी सरकारने एकूण 450 कोटी रुपयांचा निधी दिला आहे.

मंगळवारी भोपाळ येथे राज्य सचिवालयात झालेल्या ‘प्रकल्प गोशाला’चा आढावा घेताना मुख्यमंत्री कमलनाथ यांनी चार महिन्यांच्या कालावधीत सुमारे 1 लाख गायींना व त्यांच्या वासरांना ठेवण्यासाठी 1000 गोशाळा बांधण्याचे आदेश दिले, असे राज्य सरकारच्या एका अधिकाऱ्याने पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले. यापूर्वी कमलनाथ यांनी अध्यात्मासाठी खास मंत्रालय स्थापन केले आहे.

Leave a Comment