व्हिडिओकॉन कर्ज घोटाळ्यात चंदा कोचर दोषी

chanda-kocchar
नवी दिल्ली – आयसीआयसीआय बँकेच्या आचारसंहिता आणि धोरणांच्या उल्लंघनप्रकरणी व्हिडिओकॉन कर्ज घोटाळ्यात चंदा कोचर यांच्यावर कारवाई होणार आहे. बँकेच्या अंतर्गत चौकशीच्या अहवालानुसार, चुकीच्या पद्धतीने कर्ज देण्याचा आरोप कोचर यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यांनी आयसीआयसीआय बँकेत सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक पदावर असताना वेणूगोपाल धूत यांच्या व्हिडिओकॉन समूहाला ३ हजार २५० कोटींचे कर्ज दिले होते.

आयसीआयसीआय ही देशातील तिसरी मोठी बँक असून यापुढे बोनससह अन्य भत्ते चंदा कोचर यांना देण्यात येणार नाहीत. सीबीआयने त्यांना, त्यांचे पती व उद्योजक दीपक कोचर, व्हिडिओकॉनचे व्यवस्थापक धूत आणि आणखी काही जणांना गुन्हेगारी कट आणि कर्ज गैरव्यवहार प्रकरणी ताब्यात घेतले होते. त्यानंतर ६ दिवसांनी बँकेकडून ही कारवाई करण्यात आली.

सेवानिवृत्त न्यायाधीश बी. एन. श्रीकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली जारी करण्यात आलेल्या अहवालात कोचर यांना दोषी ठरवण्यात आले आहे. आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक पदी चंदा कोचर असताना वेणूगोपाल धूत यांच्या व्हिडिओकॉन समूहाला बँकेकडून ३,२५० कोटींचे कर्ज देण्यात आले. धूत यांनी त्याबदल्यात चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या कंपनीत ६४ कोटी रुपये गुंतवल्याचा आरोप होता. या नियमबाह्य वर्तनासंबंधी आयसीआयसीआय बँकेने अंतर्गत चौकशी सुरु केल्यानंतर चंदा कोचर सुरुवातीला दीर्घ रजेवर गेल्या. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात चंदा कोचर यांनी बँकेतील पदांचा राजीनामा दिला.

Leave a Comment