गायक राहत फतेह अली खानला ईडीची कारणे दाखवा नोटीस

rahat-fateh-ali-khan
नवी दिल्ली – सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ही कारवाई भारताबाहेर परकीय चलन बेकायदेशीरपणे नेल्याप्रकरणी करण्यात आली आहे.

२०११ मध्ये दिल्लीतील विमानतळावर राहत फतेह अली खान याची तपासणी करण्यात आली होती. राहत फतेह अली खान याची महसूल गुप्तवार्ता संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता त्याच्याकडे १.२४ लाख अमेरिकी डॉलर सापडले होते. चौकशी दरम्यान एवढी रक्कम कुठून आली, याची माहिती खान देऊ शकले नाही. परकीय चलनाची राहत फतेह अली खान यांनी तस्करी केल्याचा संशय आहे.

ईडीकडून ‘फेमा’ (परकीय चलन व्यवस्थापन कायदा ) अंतर्गत येणाऱ्या प्रकरणांचा तपास केला जातो. हे प्रकरण सध्या ईडीकडे आहे. ईडीने या प्रकरणात आता खान यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. समाधानकारक उत्तर देण्यात राहत फतेह अली खान अपयशी ठरल्यास त्याच्या अडचणी वाढू शकतात. त्याच्यावर ३०० टक्के दंड आकारला जाऊ शकतो. तसेच भारतात लूक आऊट नोटीस देखील जारी केली जाऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.

Leave a Comment