कुतुब मिनारशी स्पर्धा करणारा उत्तर प्रदेशातील ‘लंका मिनार’

qutub-minar
उत्तरप्रदेश राज्यातील एक भव्य मिनार रावणाला समर्पित आहे. या मिनारला ‘लंका मिनार’ या नावाने ओळखले जात असून, लंकापती रावण याला हा मिनार समर्पित आहे. या मिनाराची खासियत अशी, की भारतातील सर्वात उंच अशा सुप्रसिद्ध कुतुब मिनारच्या नंतर लंका मिनार दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक उंच मिनार आहे. या मिनाराची निर्मिती करविणारे मथुरा प्रसाद एके काळी दसऱ्याच्या वेळी होत असणाऱ्या रामलीलेमध्ये रावणाची भूमिका करीत असत. ही भूमिका वर्षानुवर्षे करीत आल्याने मथुरा प्रसाद या भूमिकेशी भावनिक दृष्ट्या इतके एकरूप झाले, की त्यांनी लंकाधिपतीच्या स्मरणार्थ चक्क एक मिनार उभा केला.
qutub-minar1
मथुरा प्रसाद यांनी बनविलेला लंका मिनार उत्तर प्रदेशातील जलौन गावामध्ये उभारला गेला असून, या मिनाराची उंची २१० फूट आहे, तर पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असलेला दिल्लीतील कुतुब मिनार २३७ फूट उंच आहे. लंका मिनाराचे निर्माण मथुरा प्रसाद यांनी १८७५ साली करविले असून, त्या काळी हा मिनार उभारण्यास एक लाख पंचाहत्तर हजार रुपये खर्च करण्यात आले होते. या मिनाराच्या आतल्या बाजूला रावण आणि रावणाच्या सर्व परिवारजनांच्या प्रतिकृती बनविल्या गेल्या आहेत.
qutub-minar2
लंका मिनाराचे निर्माणकार्य पूर्ण होण्यासाठी तब्बल वीस वर्षांचा कालावधी लागला असून, रावण मोठा शिवभक्त असल्याने या मिनारामध्ये रावणाच्या प्रतिकृतीसमोर भगवान शिवाची प्रतिकृती बनविण्यात आली आहे. कुतुब मिनारानंतर भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात उंच मिनार म्हणून लंका मिनार प्रसिद्ध असून, या मिनाराची खासियत अशी, की या मिनाराला केवळ पती-पत्नीच्या जोडीनेच प्रदक्षिणा करता येते. अन्य कोणाला या मिनाराला प्रदक्षिणा घालण्याची अनुमती नाही.

Leave a Comment