अखेर शंकरसिंह वाघेला राष्ट्रवादीत दाखल

Shankarsinh-Vaghela

गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांनी मंगळवारी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षात प्रवेश केला.

शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषद घेऊन अहमदाबाद येथे वाघेला यांना पक्षात सामील करून घेतले. यावेळी बोलताना वाघेला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. येत्या लोकसभा निवडणुकीनंतर यूपीए 3 प्रमाणे आघाडी सरकार येणार असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

वाघेला यांचे मुख्य लक्ष्य भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसच्या मतांची विभागणी करणे हे आहे. ते स्वतः गोध्रा किंवा साबरकांठा येथून निवडणूक लढविणार असल्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी गुजरात समाचार वृत्तपत्राला सांगितले. यापूर्वी वाघेला हे गोध्रा येथून विजयी झाले होते मात्र साबरकांठा येथून ते पराभूत झाले होते.

गुजरातच्या राजकारणात शंकरसिंह वाघेला यांना चार दशकांचा अनुभव आहे. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांत ते बंडखोर नेते म्हणून ओळखले जातात.

रा. स्व. संघातून आपल्या सार्वजनिक व राजकीय जीवनाची सुरूवात करणारे वाघेला हे गेल्या दोन दशकांपासून काँग्रेसमध्ये होते. गुजरात विधानसभेत ते विरोधी पक्ष नेते होते. मात्र गुजरात विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार जाहीर न केल्यामुळे नाराज झालेल्या वाघेला यांनी स्वतःचा पक्ष काढला होता. त्यांनी निवडणुकीत उतरविलेल्या सर्व 125 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली होती.

Leave a Comment