चंदा कोचर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणाऱ्या सीबीआय अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली

chanda-kocchar
नवी दिल्ली – आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांच्याविरोधात एफआयआर दाखल करणाऱ्या सीबीआय अधिकाऱ्याची तडकाफडकी सीबीआयच्या रांची येथील आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे. या अधिकाऱ्याचे नाव सुधांशू धर मिश्रा असे आहे.

व्हिडिओकॉनला आयसीआयसीआय बँकेने ३ हजार २५० कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. पण, यातील २ हजार ८१० कोटी रुपयांची परतफेड झाली नाही आणि ते एनपीए (नॉन परफॉर्मिंग अॅसेट) म्हणून घोषित करण्यात आल्याचा आरोप आहे. चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर आणि व्हिडिओकॉन समुहाचे प्रवर्तक वेणुगोपाल धूत याप्रकरणी अडचणीत सापडलेले आहेत.

नुकतीच याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मुंबईतील व्हिडिओकॉन मुख्यालय आणि इतर ३ ठिकाणांवर छापेमारी केली होती. या कारवाईनंतर सीबीआयने चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर आणि व्हिडिओकॉन ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक व्ही. एन. धूत यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

व्हिडिओकॉन ग्रुप व चंदा कोचर यांच्याविरोधात सीबीआयने कर्ज अनियमितताप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. याप्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे. आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कर्ज घोटाळ्यात अडकलेल्या चंदा कोचर यांनी राजीनामा दिली होता. आता आयसीआयसीआय बँकेने त्यांच्या जागी संदीप बक्शी यांची नियुक्ती केली आहे. त्यांचा कार्यकाळ ५ वर्षांचा असेल.

Leave a Comment