‘डोक्याला शॉट’च्या माध्यमातून मिका सिंहचे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण

mika-singh
लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला ‘डोक्याला शॉट’ नावाचा धमाल कॉमेडी चित्रपट येत असून चित्रपटाच्या नावावरुनच या चित्रपटात काहीतरी वेगळे आणि मजेशीर पाहायला मिळणार ऐवढे मात्र नक्की आहे. बॉलिवूडमधील लोकप्रिय गायक मिका सिंह या चित्रपटाच्यानिमित्ताने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे.

आपल्या भारदस्त आवाजामुळे बॉलिवूडमध्ये ओळखला जाणारा आणि असंख्य लोकप्रिय हिंदी गाण्यासाठी आपला आवाज देणारा ‘ द मिका सिंह’ या चित्रपटाच्या शीर्षक गीताला आवाज देणार आहे. तर चित्रपटाच्या शीर्षक गीताला मराठीमधील अनेक हिट गाण्यांना संगीत देणाऱ्या अमितराज यांनी संगीतबद्ध केले आहे.

उत्तुंग ठाकूर यांना या उडत्या चालीच्या गाण्याला जरा वेगळा आणि मराठीमध्ये आजवर कधीही न ऐकलेला असा आवाज हवा होता. म्हणून त्यांनी अमितराज यांना मिका सिंहचे नाव सुचवल्यानंतर जास्त वेळ न दवडता अमितराज यांनी देखील या नावाला पसंती दर्शवली.

डोक्याला शॉटच्या निमित्याने ‘अ व्हिवा इनएन प्रॉडक्शन’ पुन्हा एकदा प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी देण्यासाठी सज्ज आहे. उत्तुंग हितेंद्र ठाकूर निर्मित ‘डोक्याला शॉट’ हा चित्रपट १ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आजवर अनेक नावाजलेल्या चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शकाची भूमिका बजावणारे शिवकुमार पार्थसारथी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत.

Leave a Comment