करण जोहर लवकरच दिग्दर्शित करणार ‘गे लव्हस्टोरी’

karan-j
बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध चित्रपट निर्माता-दिग्दर्शक करण जोहर सध्या सातत्याने चर्चेचा विषय ठरत आहे. काही दिवसांपूर्वीच करणच्या ‘कॉफी विथ करण’ या टॉक-शोमध्ये आमंत्रित असलेल्या हार्दिक पंड्या आणि के एल राहुल या क्रीकेटपटूंनी, करणने विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत केलेल्या विधानांवर चांगलेच वादळ उठले होते. या दोघा क्रिकेटपटूंसोबत करण जोहरलाही लोकांनी ट्रोल करीत सोशल मिडीयाच्या माध्यमातून टिकेची झोड उठविली होती. त्यापूर्वी करणच्या ‘ऐ दिल है मुश्कील’ या चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळीही अनेक वादग्रस्त विधाने केल्याने करण चर्चेचा विषय ठरला होता. आता पुन्हा एकदा करण जोहर चर्चेचा विषय ठरत आहे. लवकरच करण जोहर एका ‘गे लव्हस्टोरी’चे दिग्दर्शन करणार असून, या चित्रपटाचे काम लवकरच सुरु करण्याचा आपला विचार असल्याचे करणने म्हटले आहे.

एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये करणने याबद्दल उल्लेख केला असल्याचे समजते. सध्या करण, त्याच्या आगामी ‘तख्त’ या चित्रपटामध्ये व्यस्त असून, हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आपण समलैंगिक प्रेमसंबंधांवर आधारित आपल्या चित्रपटावर काम सुरु करणार असल्याचेही करण म्हणाला. या चित्रपटामध्ये भूमिका करणारे कलाकार कोण असतील या बद्दल करणने अद्याप कोणताही खुलासा केला नाही.

करण जोहरने समलैंगिक प्रेमसंबंधांवर आधारित चित्रपट बनविण्याची इच्छा प्रकट केल्यापासून बॉलीवूडमध्ये सर्वत्र हाच चर्चेचा विषय ठरत आहे. हे वृत्त सोशल मिडियावरही व्हायरल होत असून, याचवर निरनिराळ्या प्रतिक्रिया पहावयास मिळत आहेत.

Leave a Comment