गुजरातमध्ये 177 कोटी रुपयांचा जीएसटी गैरव्यवहार, एकाला अटक

gst
वस्तू आणि सेवाकरामध्ये 177.64 कोटी रुपयांच्या इनपूट टॅक्स क्रेडिट मिळविण्यासाठी खोटे इनव्हॉईस दिल्याबद्दल गुजरातमध्ये एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे, असे केंद्रीय जीएसटी खात्याने शनिवारी सांगितले.

एहसास अली सैय्यद असे या व्यक्तीचे नाव असून तो वडोदरा येथील रहिवासी आहे. तो खोटे इनव्हॉईस जारी करण्याच्या घोटाळ्याचा तो मुख्य सूत्रधार आहे, असे गांधीनगर येथील केंद्रीय जीएसटी व केंद्रीय अबकारी आयुक्तांच्या कार्यालयाने म्हटल्याचे पीटीआय वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

सैय्यद हा 29 वर्षांचा असून त्याने 66 बनावट कंपन्या तयार केल्या आणि त्यांचे 66 बनावट मालक दाखवले. इनपूट टॅक्स क्रेडिट मिळविण्यासाठी त्याने त्यांच्या नावाने इनव्हॉईस काढले होते. तसेच त्याने या सर्व बनावट मालकांच्या नावावर जीएसटी नोंदणी क्रमांक, जीएसटी ओळखपत्र, लॉगिन-पासवर्ड, सिम कार्ड, बँक खाती आणि ऑनलाइन पासवर्ड प्राप्त केले आहेत.

“आरोपी स्वतःच तयार केलेल्या संस्थांच्या नावे बनावट बिले जारी करत होता. त्यात त्याने 177.64 कोटी रुपयांचे इनपूट टॅक्स क्रेडिट मिळविण्यासाठी 1,210 कोटी रुपयांचे करपात्र मूल्य असलेले इनव्हॉईस जारी केले. त्याला सीजीएसटी कायद्याच्या तरतुदींखाली अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे,” असे खात्याच्या वतीने सांगण्यात आले.

जीएसटी कायद्यानुसार, इनपूट टॅक्स क्रेडिट हे उत्पादकांनी माल विकत घेण्यासाठी दिलेल्या जीएसटीवर मिळते.

Leave a Comment