ही महिला आपल्या ब्लँँकेटशी करणार विवाह !

woman
इंग्लंडमधील डेव्हॉन प्रांतामध्ये राहणारी पास्कॅल सेलिक सध्या आपल्या विवाहाच्या तयारीमध्ये गुंतली आहे. हा विवाह पुढील महिन्यामध्ये मोठ्या थाटात पार पडणार असून, यासाठी अनेकांना निमंत्रणेही धाडली गेली आहेत. पास्कॅलने आपल्या विवाहाची घोषणा सोशल मिडियाद्वारे केली मात्र, तिची पोस्ट चांगलीच व्हायरल झाली, आणि या अजब विवाहसमारंभाबाबत अधिक जाणून घेण्याची उत्कंठा लोकांना लागून राहिली. हा विवाहसोहळा अजब अशासाठी, की पास्कॅलचा जीवनसाथी कोणी माणूस नसून, तिला अतिशय प्रिय असलेले तिचे ब्लँकेट आहे. पास्कॅलला तिचे ब्लँकेट इतके प्रिय आहे, की आपल्या ब्लँकेटसोबत विवाहबद्ध होण्याचा निर्णय तिने घेतला असून, या सोहळ्याच्या तयारीलाही ती लागली असल्याचे समजते.

या विवाहप्रसंगी ख्रिश्चन वधू परिधान करीत असलेला शुभ्र गाऊन न घालता पास्कॅल नाईट सूट परिधान करणार आहे. या नाईट सूटच्या जोडीनेच खास या प्रसंगासाठी तयार करण्यात आलेल्या स्लिपर्स आणि ड्रेसिंग गाऊनही पास्कॅल परिधान करणार आहे. या सोहळ्यासाठी उपस्थित राहणरी पाहुणे मंडळी देखील औपचारिक पोशाख परिधान न करता नाईट सूट्स परिधान करूनच या कार्यक्रमासाठी हजेरी लावणार आहेत. तसेच, अधिक थंडी असल्यास पाहुण्यांना गरम पाण्याच्या पिशव्या सोबत आणण्याबद्दल आगाऊ सूचना देण्यात आली आहे.

आपले ब्लँकेट आपल्या सोबतीला गेली कैक वर्षे असून, संरक्षण देणारा सर्वात जवळचा असा हा जोडीदार असल्याचे पास्कॅल म्हणते. तसेच आपले ब्लँकेट आपल्याला अतिशय प्रिय असून, याच्याशी विवाहबद्ध होतानाच्या आनंदाच्या प्रसंगी सर्व नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थित राहणार असल्याने आपला आनंद द्विगुणित झाला असल्याचेही पास्कॅल म्हणते. हा आगळा विवाहसोहळा पुढील महिन्यात, म्हणजेच फेब्रुवारीच्या दहा तारखेला पार पडणार आहे. त्यानंतर उपस्थित पाहुण्यांसाठी खास पार्टीचे आयोजनही करण्यात आले आहे.

ब्लँकेटसारख्या निर्जीव वस्तूशी विवाह करणारी पास्कॅल ही पहिलीच व्यक्ती नाही. या पूर्वी १९७९ साली एका महिलेने बर्लिनच्या भिंतीशी विवाह केला होता, तर २०१६ साली लॉस एंजिलीस येथील एका चित्रपटनिर्मात्याने आपल्या फोनशी विवाह केला होता. अगदी अलीकडच्या काळामध्ये, २०१८ साली एका माणसाने टोकियो येथे एका ‘हॉलोग्राम’शी विवाह केला होता.

Leave a Comment