अभिनेत्री शिल्पा शेट्टी विरुद्ध कर्जाची परतफेड न केल्याच्या आरोपावरून दावा दाखल

shilpa-shetty
अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा, तिची बहिण शमिता शेट्टी आणि शिल्पाची आई सुनंदा यांच्याविरुद्ध परहाद आमरा नामक एका ऑटोमोबाईल एजन्सीच्या मालकाने कर्जाची परतफेड न केल्याच्या आरोपावरून कोर्टामध्ये दावा दाखल केला आहे. परहादच्या म्हणण्यानुसार शिल्पाचे वडिल सुरेंद्र शेट्टी यांनी त्याच्याकडून एकवीस लाख रुपये कर्जापोटी घेतले असून, हा रक्कम शेट्टी यांनी जानेवारी २०१७ साली, व्याजासकट परत करायची होती. पण अशा प्रकारचे कोणतेही कर्ज आमरा यांच्याकडून शेट्टी यांनी घेतले नसल्याचे शेट्टी कुटुंबियांचे म्हणणे आहे. याबाबत २९ जानेवारी रोजी मेट्रोपोलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये सुनावणी व्हायची आहे.

एका वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार आमरा आणि शेट्टी कुटुंबाचे संबंध मैत्रीपूर्ण असून, याच कारणास्तव आमरा यांनी सुरेंद्र शेट्टी यांना २०१५ साली एकवीस लाख रुपये उसने दिले होते. ही सर्व रक्कम चेकने दिली गेली असून, हे सर्व चेक्स सुरेंद्र शेट्टी यांच्या ‘कोरगिफ्ट्स’ नामक कंपनीच्या नावे दिले गेले होते. या कंपनीमध्ये शिल्पा, तिची बहिण शमिता आणि सुरेंद्र यांची पत्नी सुनंदा हे सर्व भागीदार असून, या कर्जाबद्दलची संपूर्ण माहिती या सर्वांना असल्याचे आमरा यांना सुरेंद्र शेट्टी यांनी सांगितले होते, असे आमरा यांच्या तक्रारीमध्ये म्हटले आहे.

त्यानंतर २०१६ साली सुरेंद्र शेट्टी यांचे निधन झाले. कर्ज फेडण्यासाठी निश्चित केली गेलेली वेळ आल्यावर आमरा यांनी शेट्टी कुटुंबियांना कर्जाची परतफेड करण्याबद्दल सांगितले असता शेट्टी कुटुंबीयांनी याबद्दल आपल्याला कसलीच माहिती नसल्याचे सांगून कर्जाची परतफेड करण्यास नकार दिला. याबाबत वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना शिल्पाने, आपल्या वडिलांच्या व्यवसायामध्ये आपला कोणताच सहभाग नसून, या कर्जाची आपल्याला अजिबात कल्पना नसल्याचे म्हटले आहे. त्याचप्रमाणे आमरा खोटे दावे करून लोकांची दिशाभूल करीत असल्याचेही शिल्पाचे म्हणणे आहे. सध्या हा दावा कोर्टामध्ये दाखल असून, कोर्टाने पोलिसांना अधिक चौकशीचे आदेश दिले असल्याचे समजते.

Leave a Comment