जया बच्चन यांच्याकडून अमिताभ यांना आगळी भेट

abhi1
घरामधील अनावश्यक वस्तू कमी करून, आपल्या नित्याच्या उपयोगातील वस्तूंची रचना, नियोजन कशा प्रकारे केले जावे हे सांगणाऱ्या जपानी लेखिका आणि व्यवसायाने ‘ऑर्गनायझिंग कन्सल्टंट’ असणाऱ्या मारी कॉन्डो यांच्या कडून जगभरामध्ये अनेकांनी प्रेरणा घेतली आहे. वस्तूंची रचना आणि नियोजन करण्याच्या मारी यांच्या कौशल्याला आता ‘कॉन मारी टेक्निक’ या नावाने जगभर लोकप्रियता मिळत आहे. तसेच मारी यांचा ‘टायडीइंग अप विथ मारी कॉन्डो’ या नावाने नेटफ्लिक्सवर प्रसारित होत असलेला कार्यक्रमही अतिशय लोकप्रिय होत आहे. भारतामध्येही मारी कॉन्डो यांच्या कामाच्या पद्धतीने अनेकांना प्रभावित केले असून, या मंडळींमध्ये सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि बॉलीवूडचे शेहनशाह अमिताभ बच्चन यांच्या पत्नी जया बच्चन यांचाही समावेश आहे. जया बच्चन यांना मारी कॉन्डो यांनी इतके प्रभावित केले, की मारी यांनी लिहिलेले ‘द लाईफ चेंजिंग मॅजिक ऑफ टायडीइंग अप’ हे अतिशय लोकप्रिय झालेले पुस्तक, जयाजींनी अमिताभ यांना भेट म्हणून दिले आहे.
abhi
अमिताभ यांना वस्तूंचे नियोजन कसे केले जावे याचे कसब आत्मसात करण्याची प्रेरणा मिळावी असा हा भेटीमागील उद्देश असल्याचे अमिताभ म्हणतात. तसेच हे पुस्तक वाचून त्याद्वारे मिळालेले ज्ञान आपण त्वरित उपयोगात आणणार असल्याचेही अमिताभ यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. या मिश्कील ट्वीटला अनेक ‘लाईक’ आले असून, अमिताभ यांच्या हजारो चाहत्यांनी त्यावर अनेक प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत.

अमिताभ नेहमीच आपले अनेक अनुभव, विचार किंवा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये घडणाऱ्या अशा अनेक लहान मोठ्या रोचक घटना आपल्या चाहत्यांशी ट्वीटर द्वारे किंवा आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून शेअर करीत असतात. काही दिवसांपूर्वी हिंदी भाषा ही इंग्रजी भाषेला कशी वरचढ आहे हे सांगणारा अमिताभ यांचा रोचक ट्वीट ही लोकप्रिय झाला होता.

Leave a Comment