
येत्या शुक्रवारी म्हणजेच 25 जानेवारीला शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारीत ‘ठाकरे’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तसा अनेक कारणांसांठी हा चित्रपट चर्चेचा विषय ठरतो आहे. प्रदर्शनाच्या दिवशी निश्चित वेळेच्याआधी हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. रिपोर्ट्सनुसार, पहिल्यांदाच कुठल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा पहिला शो हा निश्चित वेळेच्याआधी प्रदर्शित केला जातो आहे.
पहाटे 4 वाजता ठाकरे चित्रपटाचा पहिला शो
वडाळ्याच्या आयमॅक्समध्ये पहाटे 4.45 वाजताचा ‘ठाकरे’ चित्रपटाचा पहिला शो हा ठेवण्यात आला आहे. लोकांच्या मनात ‘बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत वेगवेगळे प्रश्न आहेत. लोक बाळासाहेबांची सुरुवात कशी झाली, हे बघण्यासाठी खूप उत्सूक आहेत. लोकांना त्यांच्याबाबत जाणून घ्यायचे आहे. म्हणून या चित्रपटाची महाराष्ट्रात खूप मागणी असल्याचे आयमॅक्सच्या चालकांनी स्पॉटबॉयला सांगितले.
सकाळी सात वाजता साधारणपणे कुठल्याही चित्रपटाचा पहिला शो हा प्रदर्शित केला जातो. पण एखाद्या चित्रपटाला पहाटे 4.45 ला प्रदर्शित करणे हे पहिल्यांदाच होत आहे. ‘ठाकरे’ हा चित्रपटा बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारीत आहे. या चित्रपटात अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी यांनी बाळासाहेबांची भूमिका पडद्यावर साकारली आहे, तर अभिनेत्री अमृता राव हिने माँसाहेबांची भूमिका साकारली आहे. ‘ठाकरे’ चित्रपटाची निर्मिती शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी केली आहे. तसेच, मनसेचे नेते अभिजीत पानसे यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
या चित्रपटात बाळासाहेबांचा शिवसेना स्थापन करण्याआधीचा काळा आणि शिवसेना स्थापन केल्यानंतरचा काळ, असा दाखवण्यात आला आहे. येत्या 25 जानेवारीला हा चित्रपट देशभरात 1200 ते 1300 स्क्रीनवर प्रदर्शित होत आहे. विदेशातही 400 ते 500 स्क्रीनवर हा चित्रपटा प्रदर्शित होईल.
