दक्षिणात्य सिनेसृष्टीचे महानायक – एन टी रामा राव

n-t-rama-rao
दाक्षिणात्य सिनेसृष्टीचे महानायक समजले जाणारे सुपरस्टार एन टी रामा राव, यांची गणना भारतातील सर्वश्रेष्ठ कलाकारांमध्ये केली जाते. एन टी आर या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या महान कलाकाराचे संपूर्ण नाव नंदमुरी तारका रामा राव होते. एन टी आर यांचा जन्म आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यामधील निम्मकुरु गावामध्ये, एका सामान्य परिवारामध्ये झाला. रामा राव यांच्या परिवाराची आर्थिक परिस्थिती हालाखीची नसली, तर फार चांगलीही नव्हती. रामा राव उदरनिर्वाह करण्याकरिता दुध विकत असत. पण या परिस्थितीवर मात करून अतिशय कष्टाने वाटचाल करीत रामाराव यांनी यशस्वी अभिनेता म्हणून आपली कारकीर्द घडविली.
ntrama-rao-1
रामा राव यांच्या अभिनेयक्षेत्रातील कारकीर्दीमध्ये त्यांनी तीनशे पेक्षाही जास्त चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. त्यापैकी अनेक गाजलेले चित्रपट हे पौराणिक कथांवर आधारित होते. त्या चित्रपटांमध्ये रामा राव याच्या भूमिका अतिशय लोकप्रिय ठरल्या. किंबहुना रामा राव यांनी सतरा चित्रपटांमध्ये भगवान श्रीकृष्णाची भूमिका साकारली होती, आणि या प्रत्येक चित्रपटातील त्यांची भूमिका अतिशय गाजलीही होती. रामा राव हे उत्तम अभिनेतेच नाही, तर अतिशय कसलेले दिग्दर्शकही होते.
ntrama-rao2
रामा राव यांनी अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले असून, अनेक गाजलेल्या चित्रपटांच्या कथाही रामा राव यांनी लिहिल्या होत्या. चित्रपटाचे कथानक कसे लिहिले जावे याचे कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण न घेतलेल्या रामा राव यांच्या लेखणीतून अनेक गाजलेल्या चित्रपटांच्या कथा अवतरल्या आहेत. रामा राव हे अभिनयकौशल्यसंपन्न होतेच, पण त्याचबरोबर अतिशय शिस्तप्रिय आणि मेहनती अभिनेते म्हणून त्यांचा लौकिक होता. भूमिका कोणतीही असो, त्यासाठी पराकाष्ठेची मेहनत करण्याची तयारी असलेल्या रामा राव यांनी ‘नर्तनशाला’ या चित्रपटातील भूमिकेसाठी वयाच्या चाळीसाव्या वर्षी नृत्यकेलेचे प्रशिक्षण घेतले. असे हे एन टी आर भारतीय सिनेसृष्टीचे रत्न मानले गेले आहेत.

Leave a Comment