राणी एलिझाबेथचे पती प्रिन्स फिलीप यांच्या गाडीला अपघात

prince
ब्रिटनची राणी एलिझाबेथ यांचे पती प्रिन्स फिलीप हे चालवित असलेल्या गाडीला अपघात झाला असून, प्रिन्स फिलीप यांना सुदैवाने कोणतीही इजा झाली नसल्याचे वृत्त आहे. ९७ वर्षीय प्रिन्स फिलीप हे सँड्रींगहॅम इस्टेट येथे स्वतः गाडी चालवित असताना हा अपघात घडला असल्याचे समजते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रिन्स फिलीप त्यांची गाडी रिव्हर्स करीत असताना पलीकडून अचानक रस्त्यामध्ये आलेल्या दुसऱ्या गाडीने फिलीप यांच्या गाडीला धडक दिली. त्यानंतर प्रिन्स फिलीप चालवीत असलेली लँड रोव्हर गाडी एका बाजूला कलंडली.

सुदैवाने प्रिन्स फिलीप किंवा दुसऱ्या गाडीतील प्रवाश्यांना कोणतीही गंभीर इजा झाली नसून, अपघातानंतर सर्वांना रुग्णालयामध्ये तपासणीकरिता नेण्यात आले. तिथे तपासणी झाल्यानंतर कोणलाही गंभीर इजा झाली नसून, प्राथमिक उपचारांच्या नंतर सर्वांनाच रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. हा अपघात घडल्यानंतर प्रिन्स फिलीप अतिशय अस्वस्थ झाले असून, आता त्यांच्या मनस्थितीमध्ये सुधारणा होत असल्याचे समजते.

प्रिन्स फिलीप आता राजनैतिक जबाबदाऱ्यांमधून संपूर्णपणे निवृत्त झाले असून, राणी एलिझाबेथची खासगी इस्टेट असलेल्या सँड्रींगहॅम येथे त्यांचा निवास असतो. आता राजनैतिक आणि इतर औपचारिक समारंभांतून संपूर्णपणे निवृत्त झालेले प्रिन्स फिलीप केवळ काही मोजक्याच कौटुंबिक समारंभांना हजेरी लावताना पहावयास मिळतात.

Leave a Comment