यंदाच्या कुंभ मेळ्यामध्ये पहावयास मिळत आहेत असे ही साधू

sadhu7
प्रयागराज या ठिकाणी सध्या भक्तीचा सोहळा सुरु आहे. या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी हजारोंच्या संख्येने आलेल्या साधू-संतांबरोबर देश-विदेशातून लाखोंच्या संख्येने भाविकही येथे आले आहेत. या कुंभमेळ्यामध्ये सहभागी झालेले काही साधू लोकंच्या चर्चेचा आणि आकर्षणाचा विषय ठरत आहेत. ‘रुद्राक्षवाले बाबा’ नामक एक साधू लोकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत असून, या साधूंचे नाव वास्तविक शिवयोगी मौनी महाराज आहे. या साधू महाराजांनी गळ्यामध्ये अकरा हजार रुद्राक्षांची माला धारण केली असल्याने यांना रुद्राक्षवाले बाबा या नावाने ओळखले जाते. या अकरा हजार रुद्राक्षांच्या माळेविषयीची रोचक गोष्ट अशी, की यातील एकही रुद्राक्ष या साधू महाराजांनी स्वतः खरेदी केला नसून, हे सर्व रुद्राक्ष त्यांना भेटीदाखल मिळाले आहेत. अलीकडच्या काळामध्ये नेपाळच्या राजाकडून या बाबांना सोळा मुखी रुद्राक्ष भेट मिळाल्याचे समजते. गळ्यामध्ये एक्कावन्न हजार रुद्राक्षांची माला धारण करण्याचा या साधू महाराजांचा संकल्प असल्याचे म्हटले जाते.
sadhu6
जूनाच्या आखाड्यातून आलेले राधे बाबा यांचे वैशिष्ट्य असे, की गेली नऊ वर्षे या बाबांनी आपला एक हात वर उचलून धरला आहे. जोवर अयोध्येमध्ये राम मंदिर बनत नाही, तोवर आपला हात असाच वर उचलून धरण्याचा संकल्प या बाबांनी केला असल्याचे समजते. असाच काहीसा संकल्प ‘खडेश्वरी बाबां’चा देखील आहे. हे साधू महाराज गेली चार वर्षे एकाच पायावर उभे आहेत.

sadhu4

कुंभमेळ्यामध्ये सहभागी होणारे ‘गोल्डन बाबा’ अंगावर नेहमी अनेक सोन्याची आभूषणे लेऊन असतात. मागील वर्षी सुमारे वीस किलो वजनाची सोन्याची आभूषणे परिधान करून या महाराजांनी महाशिवरात्रीची कावड यात्रा केली होती. इतकेच नव्हे, तर सोन्याच्या अन्य आभूषणांच्या जोडीने गोल्डन बाबा, हातामध्ये २७ लाख रुपये मूल्य असलेले हिरेजडित घड्याळही धारण करतात. यंदाच्या मेळ्यामध्ये ‘टोपीवाले बाबा’ ही प्रसिद्ध झाले आहेत. या बाबांच्या डोक्यावर एक टीपी असून, त्या टोपीवर चंद्राची आकृती आहे.
sadhu1

कुंभमेळ्यामध्ये आपली आलिशान गाडी घेऊन आलेले ‘पेट्रोल बाबा’ भाविकांकडून दक्षिणा म्हणून पेट्रोल मागत असतात. यांचे खरे नाव नागा बाबा संन्यासी सावनगिरी असून हे गुजरात येथून प्रयागराज येथे आले आहेत. मेळ्यामध्ये सहभागी झालेले ‘जटाधारी’ बाबा ‘टेक फ्रेंडली’ बाबा म्हणूनही ओळखले जात आहेत. हे बाबा सतत आपल्या सोबत मोबाईल फोन, लॅपटॉप बाळगून असल्याने त्यांना ‘टेक फ्रेंडली बाबा’ या नावाने ओळखले जात आहे.

Leave a Comment